स्वतःच्या आजोबांचे नाव दिले हा महाराजांचा अपमान नाही का? भाजप पदाधिकाऱ्यांचा सवाल

राहुरी : एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे सूत्र हलविणारा कारखाना म्हणून राहुरीचा कारखाना अग्रगण्य होता. या कारखान्याला तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना असे नाव दिले होते, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून आंदोलनाची नौटंकी करत आहेत. त्यांच्याच कुटुंबीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव काढून स्वतःच्या आजोबांचे नाव दिले. हा शिवाजी महाराजांचा अपमान नाही का? असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा पडला. ही घटना निश्चितच दुर्दैवी आहे. परंतु या घटनेचे राजकारण करणे चुकीचे आहे. या घटनेचा निषेध म्हणून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आंदोलन सुरू केले आहे. याबाबत भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीका केली आहे. तालुक्यातील सहकारी चळवळीतील अग्रगण्य असा असणारा आजचा तनपुरे सहकारी साखर कारखाना त्यावेळी राहुरी कारखाना म्हणून प्रसिद्ध होता.
या कारखान्याला त्यावेळी तत्कालीन तनपुरे विरोधक असलेल्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सहकारी साखर कारखाना असे नाव दिले होते. परंतु तनपुरे कुटुंबीयांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना पुढे करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिलेले नाव छन्नी हातोड्याने तोडून कारखान्यास डॉ.बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना असे नाव दिले.
त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला नाही का? असा सवाल उपस्थित करत आज मालवण येथे घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून तनपुरे आंदोलन करत आहेत, परंतु सदरचे आंदोलन म्हणजे नौटंकी असून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली स्टंटबाजी आहे, असेही म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकावर भाजपा तालुकाध्यक्ष सुरेशराव बानकर, युवा तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ, जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा चिटणीस रविंद्र म्हसे, शहराध्यक्ष भैय्यासाहेब शेळके, युवा शहराध्यक्ष अक्षय तनपुरे, सर्जेराव घाडगे, अनिल आढाव आदींचे नावे आहेत.





