लखनौ : उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातून ताब्यात घेतलेल्या आयएसआय एजंटच्या मोबाईल फोनच्या तपासणीतून दहशतवादी संघटनांच्या मुंबई आणि राजस्थानातील स्लीपिंग सेल उघडकीस आले आहेत.
उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या आधिकाऱ्यांनी एम. रशीद या आयएसआयच्या हस्तकास अटक केली. त्याच्याकडून त्याचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याच्या मोबाईलमध्ये व्हॉट्स ऍपचे अनेक ग्रुप आढळले आहेत. त्यातील काही नंबर हे दहशतवादी गटांच्या स्लीपिंग सेलचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
हे व्हॉट्स ऍप क्रमांक पडताळून पाहण्यात येत आहेत. तसेच ते अन्य कोणत्या ग्रुपमध्ये आहेत, तेही तपासले जात आहे, यातील काही क्रमांक हे जोधपूर, जयपूर आणि मुंबईतील आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
रशीदला तीन दिवसांचा कस्टोडियल रिमांड मिळाला असून उत्तर प्रदेश एटीएस वगळता लष्करी गुप्तचर खाते, गुप्तचर खाते, आणि अन्य राज्यांच्या एटीएस अशा आठ संस्था एकत्रित तपास करत आहेत. त्याचा रिमांड एटीएसने वाढवून मागितला नाही तर त्याला कारागृहात शुक्रवारी पाठवण्यात येईल.
एटीएस अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार, या आयएसआय हस्तकाबरोबर सहभागी असणाऱ्यांचा लवकरच छडा लावण्यात येईल. त्याच्याकडून मिळालेली माहिती अन्य राज्याच्या एटीएस आणि वेगवेगळ्या राज्यातील उच्च सुरक्षा यंत्रणांना देण्यात येत आहे.
फलक बसवून देण्याच्या कामातून फारसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे आयएसआयच्या हॅंडलरकडून अधिक पैसे देण्याचे आश्वासन मिळाल्याने तो हे काम करत असे, असे त्याने तपासात सांगितले आहे. त्याने त्यांच्याशी आणि अन्य संबंधितांशी संपर्कासाठी व्हॉट्स ऍप वापरले तर तो पकडला जाणार नाही, असे त्याच्या हॅंडलरनी त्याला सांगितले होते, असे त्याने चौकशी अधिकाऱ्यांना सांगितले.
रशीद हा पाकिस्तानातील एका पत्रकाराशी वारंवार बोलत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबाबतचे पुरावे त्याच्या फोनमध्ये सापडले आहेत. त्याच्या काही ऑडिओ क्लिप सापडल्या आहेत. तो पाकिस्तानात गेला होता त्यावेळी 2018मध्ये या पाकिस्तानी पत्रकाराशी त्याची ओळख झाली होती. मात्र तो गोपनीय माहिती अथवा डाटा विचारत नसल्याचे रशीदने या पुर्वी सांगितले आहे.