Ishaq Dar : पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी खोडून काढला ट्रम्प यांचा ‘तो’ दावा

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान दरम्यान कोणत्याही त्रयस्थ देशाची मध्यस्थी भारताने कधीही मान्य केली नाही, असे खुद्द पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीच मान्य केले आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर आपल्याला मध्यस्थी करण्याची विनंती करण्यात आली होती, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष यांनी केला होता. पण दार यांनीच हा दावा खोडून काढला आहे.
भारताबरोबर काश्मीरच्या मुद्द्यावर अमेरिकेने मध्यस्थी करावी, अशी विचारणा पाकिस्तानने जेंव्हा अमेरिकेकडे केली होती, तेंव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीच भारताची भूमिका काय असल्याचे सांगितले होते. पाकिस्तानबरोबरचे सर्व मतभेद द्विपक्षीय असल्याने त्रयस्थाची मध्यस्थी भारत कधीच मान्य करणार नाही, असे रुबिओ यांनी आपल्याला सांगितले होते, अशी आठवण दार यांनी सांगितली.
त्रयस्थाच्या मध्यस्थीला आम्हाला काहीच हरकत नाही. पण द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये भारत अशी मध्यस्थी कधीच मान्य करणार नाही. जर द्विपक्षीय संवाद दहशतवाद, व्यापार, अर्थकारण, जम्मू आणि काश्मीरसह पूर्वी चर्चा झालेल्या सर्व मुद्द्यांवर होणार असेल, तर अशी मध्यस्थी मान्य करायला आम्हाला काहीही हरकत नाही, असे दार म्हणाले. मे महिन्यात अमेरिकेने युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता. एखाद्या त्रयस्थ ठिकाणी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होऊ शकते, असेही म्हटले होते. मात्र हा प्रस्ताव भारताने नाकारला होता. रुबिओ यांनी २५ जुलै रोजी अमेरिकेतल्या भेटीदरम्यान आपल्याला भारताची भूमिका सांगितल्याचे दार म्हणाले.





