Isha malviya: ‘शेकी’ फेम ईशा मालवीयने बाबांसाठी घेतली आलिशान गाडी; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Isha malviya: लोकप्रिय अभिनेत्री ईशा मालवीयने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करत नवी थार रॉक्स गाडी खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, ही गाडी ईशाने स्वतःसाठी नव्हे तर बाबांसाठी घेतली आहे. अवघ्या २१ वर्षांच्या ईशाने अल्पावधीत मिळवलेल्या यशामुळे आज तिच्या कुटुंबाचा अभिमान दुणावला आहे.
हिंदी मालिकांमधून, ‘बिग बॉस १७’ मधून आणि अलीकडेच गाजलेल्या संजू राठोडच्या ‘शेकी’ गाण्यातील दमदार परफॉर्मन्समुळे ईशा चर्चेत आली होती. याच काळात तिच्या वडिलांनी थार गाडी घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. हीच इच्छा पूर्ण करत ईशाने बाबांना नवी चारचाकी गिफ्ट दिली आहे.
गाडी घेताना ईशा आणि तिचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. नवीन गाडीची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर केक कापून सर्वांनी आनंद साजरा केला. ईशाने या व्हिडिओसोबत कॅप्शन लिहिले, “पप्पा, आजवर तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आता तुमच्या प्रत्येक इच्छेची जबाबदारी माझी आहे.”
ईशाने खरेदी केलेल्या थार रॉक्सची किंमत १२.९९ लाख ते २३.०९ लाख इतकी असल्याचे सांगितले जाते. या गिफ्टनंतर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
ईशाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “आम्हाला तुझा अभिमान वाटतोय ईशा”, “तू खरी आयडॉल आहेस” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
सध्या ईशा ‘शेकी’ गाण्यामुळे जगभरात लोकप्रिय झाली असून चाहते तिला प्रेमाने ‘शेकी गर्ल’ म्हणूनही ओळखू लागले आहेत.

