मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. आता ठाकरे गटाने देखील मोदींच्या डिग्रीवर ‘सामना’तून काही सवाल उपस्थित केले आहेत. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे, असे काही सवाल उपस्थित करण्यात आले आहे.
सामनाच्या अग्रलेखात मोदींवर निशाणा साधत लिहिले की, ‘पंतप्रधानांची डिग्री सार्वजनिक करा अशी याचिका अरविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात करताच न्यायालयाने केजरीवाल यांनाच 25 हजारांचा दंड ठोठावला. त्यामुळे मोदींची जास्तच बदनामी झाली आणि ती गुजरातच्या न्यायालयाने केली. पंतप्रधान अनपढ आहेत काय? त्यांचे शिक्षण किती? हे जाणून घेण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण मोदी यांना ”तुमची इयत्ता कंची?” असे विचारले की, हा बदनामीचा कट आहे असा आक्षेप घेतला जाते. मुळात यात लपविण्यासारखे काय आहे?
‘देशाला शिकलेला पंतप्रधान हवा असे बोलणे यात मोदींची अशी काय बदनामी झाली? मोदींकडे तर एक रहस्यमय डिग्री आहे व Entire Political Science हा कोणी कधीच न ऐकलेला विषय घेऊन त्यांनी ‘एम. ए.’ केले. फक्त ते त्यांची डिग्री दाखवायला तयार नाहीत. आज देश मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी, कृषी कायदे, नोटाबंदी अशा निर्णयांची किंमत चुकवीत आहे.’
‘राहुल गांधी यांना बनावट खटल्यात शिक्षा ठोठावून त्यांची खासदारकी रद्द करणे ही लोकशाहीची हत्या आहे व जगातील अनेक देशांनी त्यावर चिंता व्यक्त केली. मात्र देशाच्या बदनामीपेक्षा मोदींना स्वतःच्या बदनामीची पडली आहे. देशाच्या प्रतिमेला तडे गेले आहेत व त्याला जबाबदार मोदी व त्यांचे अंध भक्त आहेत. जे पंतप्रधान स्वतःचे ‘शिक्षण’ लपवत आहेत, त्यांची ‘उगाच’ बदनामी करण्याचे कष्ट कोण कशाला करेल? मोदींचे कर्मच त्यांच्यावर उलटले आहे. त्यांनी जे पेरले तेच उगवले आहे. Entire Political Science ची डिग्रीही त्याच पेऱ्यातून उगवली आहे. या सगळयावर उत्तर देण्याची 56 इंची छाती आहे काय?’, असे खरमरीत सवाल ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदींना करण्यात आले आहे.