Manikrao Kokate | Harshvardhan Sapkal | राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांनी केलेल्या अनेक विधानामुळे नेहमी चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले. येथील भागातील नुकसानीची पाहणी करताना काढलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करायचे? ढेकळाचे पंचनामे करायचे का या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. कृषीमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी समाचार घेत थेट कोकाटेंना इशाराच दिला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वायफळ बडबड करून शेकऱ्यांचा अपमान करत आहेत. कर्जमाफीतून शेतकरी मुलींची लग्ने करतात, साखरपुडे करतात अशी मुक्ताफळे त्यांनी उधळली. आता त्यांनी ढेकळाचे पंचनामे करू का असा उद्धठ प्रश्न केला आहे. या कृषीमंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल सपकाळ यांनी केला आहे. तसेच कोकाटे यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी योग्य समज द्यावी अन्यथा काँग्रेस व शेतकरीच त्यांना योग्य ती समज देतील, असा इशारा देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. भाजपवर टीका केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु, ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका देखील सपकाळ यांनी केली. 2014 ते 2024 काळात मोदी सरकारने 45 टक्केच वाढ केली आहे. 2004 ते 2014 या काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने 10 वर्षात हमीभावात 120 ते 150 टक्के वाढ दिली होती, असे त्यांनी सांगितले. कृषीमंत्री नेमकं काय म्हणाले ? नुकसानीच्या पाहणी संदर्भात कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती पत्रकारांना दिली. तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. हेही वाचा: चौंडीत रोहित पवार गोपीचंद पडळकर आमनेसामने; सत्कार करण्याचा प्रयत्न…पण; मध्यरात्री नेमकं काय घडलं?