पाटणा : जनशक्ती जनता दलाचे (जजद) संस्थापक तेजप्रताप यादव आणि भाजपचे खासदार रविकिशन शुक्रवारी पाटणा विमानतळावर एकत्र दिसले. त्यांच्या भेटीने भुवया उंचावल्या गेल्या. भाजपशी राजकीय जवळीक साधण्याचे तेजप्रताप यांचे मनसुबे आहेत का, असा प्रश्न त्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.विधानसभा निवडणुकीमुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. त्या रणसंग्रामाच्या पहिल्या टप्प्यासाठी गुरूवारी बिहारमधील आजवरच्या सर्वांधिक मतदानाची नोंद झाली. त्यातून निवडणूक अतिशय अटीतटीची होण्याचे संकेत मिळत आहेत. अशात तेजप्रताप आणि रविकिशन मनमोकळ्या गप्पा मारत एकत्रितपणे विमानतळाबाहेर येत असल्याचे पाहून पत्रकार चक्रावले. त्यांनी तातडीने दोन्ही नेत्यांना गाठून प्रश्नांचा भडीमार सुरू केला. भाजपशी मैत्री करणार का, या प्रश्नावर तेजप्रताप यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. बेरोजगारी हटवणाऱ्या कुणालाही माझी साथ असेल, असे त्यांनी म्हटले. भाजपच्या काही नेत्यांकडून तेजप्रताप यांची प्रशंसा केली जात आहे. त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर रविकिशन पुढे सरसावले. मनात असेल ते तेजप्रताप मनमोकळेपणे बोलतात. ते इतरांना आवडते, असे ते म्हणाले. नवी राजकीय समीकरणे जुळतील का, या प्रश्नावर काहीही घडू शकते, असे सूचक उत्तर रविकिशन यांनी दिले. तेजप्रताप हे राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र आहेत. मात्र, तेजप्रताप यांच्या काही कृती न रूचल्याने त्यांची लालूंनी काही महिन्यांपूर्वी राजदमधून हकालपट्टी केली. त्यानंतर तेजप्रताप यांनी वेगळी राजकीय चूल मांडली. स्वतंत्र पक्ष स्थापन करून ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. ते स्वत: महुआमधून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या पक्षाने काही जागांवर उमेदवार दिले आहेत.