एकाच दिवशी सराफासह तिघांना भररस्त्यात लुटल्याने दहशत
पुणे – शहरात शस्त्राचा धाक दाखवून वाटमारीच्या घटना (स्ट्रीट क्राइम) वाढल्या आहेत. मंगळसूत्र हिसकावण्याच्या गुन्हेगारीने आता गंभीर स्वरुप धारण केले आहे. किंमती ऐवज, रोकड, मोबाइल, दागिनेच नव्हे तर वाहनेही जबरदस्तीने लुटली जात आहेत. दिल्ली, बिहार आणि उत्तरप्रदेशातील गुन्हेगारीची आठवण होईल अशा घटना शहरात घडत आहेत. या घटना रोखण्यात पोलिसांना सपशेल अपयश येत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठका, आयुक्त कार्यालयात माहिती पाठवणे, फाइल्सचा निपटारा करणे तसेच विविध उपक्रम आणि तांत्रिक सेवांतच व्यस्त आहेत. पण, गस्त आणि वाटमारी रोखण्याच्या दृष्टीने कोणतेही नियोजन होताना दिसत नाही.
कार आणि मोबाइल लुटला
भाड्याने कार पाहिजे असल्याचे सांगत टूर व्यावसायिकाला दांडेकर पुलावर बोलावून घेतले. यानंतर शस्त्राचा धाक दाखवत कार, मोबाइलसह 10 हजारांची रोकड जबरदस्तीने लुटून नेली. याप्रकरणी एका भामट्याविरुद्ध दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ईस्माइल शेख (44, रा. दत्तवाडी) त्यांना एका व्यक्तीने गुरुवारी दुपारी कार भाड्याने पाहिजे असल्याचा कॉल केला होता. त्यानुसार ते दांडेकर पूल येथे गेले. तेथे कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना शस्त्राचा धाक दाखवत कारसह 1 लाख 62 हजारांचा ऐवज लुटून पोबारा केला. आरोपीने जस्ट डायलवरुन गाडी बुक केली होती. आरोपी दांडकर पूल येथे गाडीत बसल्यावर त्याने फिर्यादीला पानशेत रोडवर नेले. तेथे सुनसान रस्त्यावर त्याला दमदाटी करुन कारसह पळ काढला. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक के. डी. संकपाळ करत आहेत.
सराफाला गाडीवरून पाडून ऐवज चोरला
दुचाकीला लाथ मारुन सराफाला खाली पाडण्यात आले. यानंतर दुचाकी, डिक्कीत ठेवलेले दागिने व रोकड असा 1 लाख 6 हजारांचा ऐवज चोरण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री घोले रोडकडे जाताना घडली. याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मिठुसिंग राजपुरोहित (46, रा. कसबा पेठ) हे दुचाकीवरुन जाताना दुचाकीवरुन दोन व्यक्ती आल्या. त्यांनी राजपुरोहित यांना लाथ मारुन खाली पाडले. यानंतर त्यांना दमदाटी करत त्यांची दुचाकी घेऊन पळ काढला. त्यांच्या डिक्कीत सोन्याचे दागिने आणि रोकड होती. फिर्यादी यांचे वडारवाडीत सराफा दुकान आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस.लाड करत आहेत.
कोयत्याने वार करत कारचालकास लुटले
कारचालकावर कोयत्याने वार करून लुटण्यात आले. ही घटना गुरुवारी रात्री आंबेगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी दुचाकीवरील तीन व्यक्तींविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महादेव जाधव (40, रा. आंबेगाव बुद्रुक) हे त्यांच्या कारने जाताना त्यांना नऱ्हे येथे असताना मोबाइलवर कॉल आला होता. यावेळी ते कार थांबवून बाहेर उतरुन बोलत होते. इतक्यात दोन काळ्या दुचाकीवरुन तीन अज्ञात व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी जाधव यांच्या डाव्या हातावर कोयत्यासारख्या हत्याराने वार करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर त्यांच्या दोन अंगठ्या, मोबाइल व रोख 7 हजार असा 47 हजार रुपये ऐवज लुटून नेला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. जे. महांगडे करत आहेत.