साड्या आहे की मच्छरदाणी?; राणा दाम्पत्याने वाटप केलेल्या साड्या पाहून आदिवासी महिलांचा संतप्त सवाल

Navneet Rana| अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून आदिवासी महिलांना साडयांचे वाटप करण्यात आले. मात्र या साडया अत्यंत निकृष्ट दर्जाच्या आहेत. त्यामुळे या ‘साड्या आहेत की मच्छरदाणी?’ असा संतप्त सवाल आदिवासी महिलांकडून केला जात आहे. मेळघाटमधील आदिवासी महिलांचा संताप व्यक्त करणारा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. यावरून राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली जात आहे.
मेळघाटामधील आदिवासी बांधवांसोबत दरवर्षी राणा दाम्पत्य होळी साजरी करतात. मात्र यंदा होळीच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणा दांपत्याने होळीपूर्वी मेळघाट येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली आणि महिलांना साड्यांचं वाटप केलं. परंतु राणा दाम्पत्याने दिलेल्या साड्या पाहून आदिवासी महिलांना प्रश्न पडला आहे, की ही साडी आहे की मच्छरदाणी? कारण अतिशय निकृष्ट दर्जाच्या या साड्या असल्याचं या आदिवासी महिला सांगत आहेत. यातील अनेक साड्या फाटलेल्या आहेत. त्या महिलांना घालण्यायोग्यही नसल्याचं सांगितलं जात आहे.
फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते!
तर मग देता कशाला ?
गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला?राज्यातील अंत्योदय रेशनकार्डवर वर्षातून एक साडी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्य यंत्रमाग महामंडळामार्फत ही योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, जाहिरात,… pic.twitter.com/5xCKFLyPo5
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 12, 2024
निवडणुकीच्या तोंडावर अशा साड्या वाटप करून तुम्ही आमची थट्टा लावली आहे का? असा सवाल देखील काही महिलांनी उपस्थित केला आहे. तसेच साड्या वाटून आदिवासी लोकांना मतांसाठी आमिष दाखवलं जात असल्याचा आरोपही होऊ लागला आहे. विरोधकांकडून देखील याप्रकरणी राणा दाम्पत्यावर टीका केली आहे. कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते! तर मग देता कशाला ? गरीब महिला भगिनींची चेष्टा करायला?’ असा सवाल या ट्वीट अर्थात एक्सद्वारे केला आहे.
दरम्यान, 2019 साली अमरावतीतून अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या खासदार रवी राणा यंदा भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे.





