इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची बहीण उझमा खान यांनी अदियाला तुरुंगातून बाहेर येताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. खानम यांनी सांगितले की तुरुंगात इम्रान खान यांची शारीरिक प्रकृती ठीक असली तरी त्यांना मानसिक त्रास (Mental Torture) दिला जात आहे. तसेच, आपल्या भावावर होत असलेल्या या अत्याचारासाठी त्यांनी थेट पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना दोषी ठरवले आहे. तुरुंगात ‘टॉर्चर’ – उझमा खानम यांना त्यांच्या भावाला भेटण्यासाठी केवळ २० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. त्यांनी माहिती दिली, “इम्रान खान यांची प्रकृती सध्या ठीक आहे, पण त्यांना खूप मानसिक त्रास दिला जात आहे.” पुढे त्यांनी सांगितले की, “इम्रान खान खूप रागात होते. त्यांना दिवसभर एका खोलीत बंद करून ठेवले जाते आणि त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ दिला जात नाही.” उझमा खानम जेव्हा इम्रान खान यांना भेटण्यासाठी तुरुंगात गेल्या, तेव्हा पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे अनेक समर्थक तुरुंगाबाहेर जमा झाले होते. पीटीआयचा तुरुंगाबाहेर मोठा विरोध – माजी पंतप्रधानांना भेटण्याच्या अधिकारांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात पीटीआय पक्षाने मंगळवारी (२ डिसेंबर २०२५) इस्लामाबाद उच्च न्यायालय आणि अदियाला तुरुंगाबाहेर जोरदार विरोध प्रदर्शन केले. गेल्या अनेक आठवड्यांपासून इम्रान खान यांच्या कुटुंबाला आणि पक्ष नेत्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचा दावा पीटीआयने केला होता. रावळपिंडीत ‘कलम १४४’ लागू – खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल अफरीदी यांनी सांगितले की, २७ ऑक्टोबरनंतर इम्रान खान किंवा त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना कोणालाही भेटण्याची परवानगी मिळालेली नाही. पीटीआयच्या या विरोध प्रदर्शनापूर्वीच इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये कलम १४४ (Section 144) लागू करण्यात आले होते. पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलहाल चौधरी यांनी कठोर इशारा दिला होता की, कलम १४४ चे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तलहाल चौधरी यांनी स्पष्टपणे सांगितले, “ते इस्लामाबाद उच्च न्यायालयात आले तरी किंवा अदियाला तुरुंगाबाहेर आले तरी, कलम १४४ अंतर्गत कोणत्याही भेदभावाशिवाय कारवाई केली जाईल.” त्यांनी विशेषतः पीटीआय समर्थित खासदारांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.