Pune District | म्हाळसाकांत जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार

लोणीधामणी, – नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली. संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष आंबेगाव- शिरूर विधानसभा निवडणुकीडे लागले होते कारण दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे व एके काळी वळसे पाटील यांच्या निकटवर्तीय असलेले देवदत्त निकम हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
निकम यांच्या प्रचारादरम्यान देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार हे वळसे पाटील यांच्यविरोधात काय बोलणार, ही उत्सुकता मतदारांना लागली होती. मात्र, पवार यांनी शेवटच्या दोन मिनिटात वळसे पाटील यांचा पराभव करा..करा..करा.असे विधान केल्याने वळसे पाटील यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, वळसे यांनी प्रचाराच्या सांगता सभेत अनेक प्रश्नांची पुराव्यासह उत्तरे दिली. तरीही ही लढत अटीतटीचीच झाली. मागील चार पाच निवडणुकीत चाळीस ते पन्नास हजारांच्या फरकाने येणारे वळसे पाटील ह्यावेळेस केवळ १५०० मतांनी आठव्यांदा निवडून आले. मात्र, गेल्या सात निवडणुकीपेक्षा ही निवडणूक गाजली ती फक्त आणि फक्त डिंभे धारणाचा बोगदा व दुष्काळग्रस्त भागातील शेतीच्या पाणी प्रश्नावर.
निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान अंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी चा पाणी प्रश्न,सातगाव पठार, लोणी धामणी तर शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदुर सह बारा गावांचा जल सिंचन प्रकल्प संदर्भातील आश्वासने इ.मुद्यावर गाजली. मात्र, निवडणुकीचा निकाल लागला आणि शेतीच्या पाणी प्रश्न सुटणार म्हणून दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. गेली अनेक वर्षे लोणी धामणी परिसरासाठी वरदान ठरणारी म्हाळसाकांत जलसिंचन उपसा योजनेचा आराखडा तयार झाला असून लवकरात लवकर योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे सहकार मंत्री, विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
जवळपास तीस वर्षांपूर्वी लोणी धामणीसह आठ गावातील शेतीला वरदान ठरणारा म्हाळसाकांत जल सिंचन उपसा प्रकल्प अजूनही कागदावरच असल्याची चर्चा सातत्याने दुष्काळग्रस्त गावांमध्ये होत आहे. त्यावर वळसे पाटील यांनी पुढील पाच वर्षे फक्त पाणी प्रश्नांवर काम करणार असून गेली सहा महिन्यांपूर्वी म्हाळसाकांत जलसिंचन प्रकल्पाचा समावेश कुकडी प्रकल्पात केला असून योजनेचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून आराखडा निधी मंजुरीसाठी शासनाला सादर केला असून लवकरच योजना मार्गी लागणार असल्याचे सांगितले आहे.
प्रकल्पांसाठी आशेचा किरण
सध्या वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तसेच डिंभे धरणातून होणाऱ्या बोगद्याच्या विरोधात आपण सत्ताधारी पक्षाच्या बरोबर गेलो असल्याचे सूचक वक्तव्य प्रचारादरम्यान केले. तसेच शेवटच्या श्वासापर्यंत डिंभे धरणाच्या एक थेंबालाही धक्का लागू देणार नाही. त्यामळे आता तरी पाणी प्रश्न मार्गी लागणार का ? तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत विश्वास बसणार नाही, असे मत दुष्काळ ग्रस्त गावातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.





