अमरावती – व्यावसायिक उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी इरफान शेख याला आज अमरावती पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता 7 जुलैपर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.भाजप नेत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला पोलिसांनी शनिवारी रात्री बेड्या ठोकल्या होत्या.
अमरावती पोलिसांनी इरफान शेखला न्यायालयात हजर करताना आपली बाजू मांडली. या प्रकरणातील मास्टरमाईंड इरफान शेख याची अधिक चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्हाला त्याची कस्टडी मिळाली, असा युक्तीवाद पोलिसांकडून करण्यात आला. तसेच व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्याप्रकरणात पैशाचा काही प्रकार आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहे.
इरफान शेख ज्या रहबरिया एनजीओचा सदस्य होता, त्याची बॅंक डिटेल्स पोलीस एकत्र करत आहेत. दरम्यान, इरफान शेख याच्याकडे येणाऱ्या पैशांची माहिती मिळाल्यानंतर त्याची चौकशी करावी लागेल. त्यामुळे त्याची कस्टडी आम्हाला मिळावी, असा युक्तीवाद पोलिसांनी केला.
या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत कोल्हेने अमरावतीतील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुदस्सीर अहमद आणि 25 वर्षीय शाहरुख पठाण या दोघांना 23 जून रोजी अटक करण्यात आली होती.