इरफान व रैनाने ऑस्ट्रेलियन फलंदाजाबाबतचे उघड केले गुपित

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज हरभजनला घाबरायचे
मुंबई – भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे जागतिक क्रिकेटवरचे वर्चस्व मोडीत काढले. 1990 च्या दशकाच्या अखेरपासून भारतीय संघाने सातत्याने ऑस्ट्रेलियाला नमविले आहे. भारतीय संघातील अव्वल गोलंदाज हरभजन सिंग याच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे बलाढ्य फलंदाज अत्यंत घाबरुन बाद व्हायचे, असे गुपित क्रिकेटपटू इरफान पठाण व सुरेश रैना यांच्या सोशल चॅटमधील चर्चेद्वारे उघड झाले आहे.
मुळातच ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना ऑफस्पीन खेळणे कठीण जाते हा इतिहास आहे. त्यांना वेगवान गोलंदाजी तसेच लेगस्पीन गोलंदाजीची कधीच भीती वाटत नाही. मात्र, ऑफस्पिन खेळणे त्यांना जमतच नाही. त्यांच्या संघातील त्यावेळचे दादा फलंदाज हरभजन गोलंदाजीला आला की गलीतगात्र झालेले मी पाहिले आहे. स्टिव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग यांच्यासह अनेक अव्वल फलंदाज हरभजनसमोर चक्क नांगी टाकायचे, असे इरफान पठाणने सांगितले.
या चॅटवर चर्चा करताना खुद्द हरभजननेही काही प्रसंग सांगितले. पॉन्टिंगने निवृत्ती घेतल्यावर तो मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला. तेव्हा आम्ही अनेकदा सरावही करायचो. त्याला माझ्या गोलंदाजीची इतकी भीती होती की तो सराव सत्रातही माझी गोलंदाजी खेळू शकत नव्हता, अशी आठवण खुद्द हरभजन यानेच सांगितली.





