IRCTC New Rule 2026 : आजपासून म्हणजे १२ जानेवारी २०२६ पासून भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दोन महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. रेल्वे प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रत्येकाने हे बदल समजून घेणे आवश्यक आहे, कारण याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि तिकीट बुकिंगच्या पद्धतीवर होणार आहे. सर्वात मोठा बदल तिकीट बुकिंगच्या प्रक्रियेत झाला आहे. रेल्वे प्रवासाचे आरक्षण साधारणपणे प्रवासाच्या तारखेच्या ६० दिवस आधी सुरू होते. आता नवीन नियमानुसार, ज्या दिवशी आरक्षण सुरू होईल, त्या पहिल्या दिवशी ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी तुमचे IRCTC खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे. जर तुमचे खाते आधार कार्डने प्रमाणित (Verify) केलेले नसेल, तर तुम्हाला आरक्षणाच्या पहिल्या दिवशी तिकीट बुक करता येणार नाही. रेल्वेने हे पाऊल प्रामुख्याने तिकीट दलालांना रोखण्यासाठी उचलले आहे. अनेकदा दलाल बनावट खाती वापरून सर्व तिकिटे बुक करतात, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना ‘वेटिंग’ मिळते. आता आधार सक्तीमुळे केवळ खऱ्या प्रवाशांनाच पहिल्या दिवशी तिकीट मिळवणे सोपे होणार आहे. ही अट फक्त ऑनलाइन तिकीट काढणाऱ्यांसाठी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वे प्रवासाच्या भाड्यात केलेली दरवाढ. रेल्वेने वेगवेगळ्या वर्गांसाठी आणि अंतरासाठी तिकीट दरात वाढ केली आहे. स्लीपर क्लास आणि जनरल डब्यांसाठी प्रति किलोमीटर एक पैशाची वाढ करण्यात आली आहे, तर एसी आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांसाठी ही वाढ प्रति किलोमीटर दोन पैसे इतकी आहे. ही वाढ ऐकायला कमी वाटत असली, तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात अंतराचे अतिरिक्त शुल्कही जोडले जाणार आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा प्रवास ७५० किलोमीटरपर्यंत असेल तर ५ रुपये आणि जर तो २२५० किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर २० रुपयांपर्यंत जादा शुल्क आकारले जाईल. म्हणजेच तुम्ही जितका लांबचा प्रवास कराल, तितका तुमच्या तिकिटाचा दर वाढत जाईल. या नवीन बदलांमुळे आता प्रवाशांना तिकीट काढण्यापूर्वी आपले IRCTC खाते तपासून घ्यावे लागेल. जर तुमचे खाते अजूनही आधारशी जोडलेले नसेल, तर ऐनवेळी तिकीट बुक करताना तुमची गैरसोय होऊ शकते. तसेच, वाढलेल्या भाड्यामुळे आता प्रवासाचे बजेटही थोडे वाढवावे लागणार आहे. रेल्वेने यापूर्वी टप्प्याटप्प्याने काही निर्बंध आणले होते, मात्र आजपासून लागू झालेला हा नियम पूर्णपणे आधार कार्डवर आधारित सुरक्षित प्रवासासाठी आहे. IRCTC सोबत आधार कार्ड लिंक कसे करावे? IRCTC सोबत आधार कार्ड लिंक करणे अतिशय सोपे आहे. सर्वात आधी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर किंवा ॲपवर जाऊन तुमच्या यूजर आयडीने लॉगिन करा. त्यानंतर होम पेजवरील ‘MY ACCOUNT’ या पर्यायावर क्लिक करून ‘Link Your Aadhaar’ निवडा. येथे तुमचा नाव आणि १२ अंकी आधार क्रमांक टाकून चेकबॉक्सवर टिक करा आणि ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल, तो प्रविष्ट करून ‘Verify OTP’ बटण दाबा. शेवटी, ‘Update’ वर क्लिक केल्यास तुमचे आधार यशस्वीरित्या लिंक होईल. यामुळे तुम्ही महिन्यातून २४ पर्यंत तिकिटे बुक करू शकाल.