इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला खामेनी भूमिगत

तेहरान : हिज्बुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहला लेबेनॉनमधील माऱ्यामध्ये इस्रायलने ठार केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनी सुरक्षित ठिकाणी निघून गेल्याचे वृत्त पुढे येते आहे. नसरल्लाह मारला गेल्यानंतर खामेनी यांनी यावरून इस्रायवर टीका केली आणि त्यानंतर ते गोपनीय ठिकाणी निघून गेल्याचे वृत्त पुढे आले आहे.
खामेनी यांच्या सुरक्षेमध्ये देखील मोठी वाढ करण्यात आली असल्याचे या वृत्तामध्ये म्हटले गेले आहे. काही आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी खामेनी गोपनीय ठिकाणी निघून गेल्याचे वृत्त दिले आहे. मात्र इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने मात्र या संदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. गाझा आणि लेबेनॉनमधील घडामोडींवर इराणकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. त्याच्या अनुषंगाने पुढील पावले काय उचलायची याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
हिज्बुल्लाहचा प्रमुख मारला गेल्यानंतर आता लेबेनानमधील या निमलष्करी संघटनेचे नेतृत्व कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र जरी प्रमुख कमांडर मारला गेला असला, तरी हिज्बुल्लाहचे काम सुरूच राहिल, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जेरुसलेम स्वतंत्र करण्यासाठीचा नसरल्लाहच्या पवित्र मार्गाने सुरू असलेला लढा यापुढेही सुरूच राहिल, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नासेर कनानी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
इस्रायलचा अदूरदृष्टीपणा…
नसरल्लाह ठार झाल्यावर हा इस्रायलचा लेबेनॉनबाबतचा अदूरदृष्टीपणा आणि मूर्खपणा असल्याची टीका खामेनी यांनी केली आहे. लेबेनॉनमधील असुरक्षित लोकांचा नरसंहार करण्याने झिओनिस्ट वेड्या कुत्र्याचा क्रूरपणा पुन्हा एकदा सर्वांच्या समोर आला आहे आणि हडप करणाऱ्या राजवटीच्या नेत्यांचे अदूरदर्शी आणि मूर्ख धोरण सिद्ध केले, असे खामेनी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र या निवेदनात हिज्बुल्लाहच्या भवितव्याविषयी त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.





