liquor price hike: इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होत असून त्याचा फटका आता मद्य उद्योगालाही बसू लागला आहे. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे देशातील मद्य, बिअर आणि वाइनच्या किंमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील मद्य उत्पादक कंपन्यांच्या संघटना ‘कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज’ (CIABC) आणि ‘ब्रूअर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (BAI) यांनी विविध राज्य सरकारांना पत्र पाठवून किंमतवाढीस परवानगी देण्याची मागणी केली आहे. वाढलेल्या इनपुट कॉस्टमुळे सध्याच्या दरात व्यवसाय चालविणे कठीण होत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. पॅकेजिंग खर्चात मोठी वाढ – उद्योग संघटनांच्या माहितीनुसार, काचेच्या बाटल्यांच्या किमतीत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. तसेच पेपर कार्टन आणि पॅकेजिंग बॉक्सचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. अॅडहेसिव्ह, LDPE, BOPP यांसारख्या आवश्यक साहित्यांच्या किंमतींमध्येही २० ते २५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय मालवाहतूक आणि लॉजिस्टिक्स खर्चातही सुमारे १० टक्के वाढ झाल्याने उत्पादन खर्च आणखी वाढला आहे. फिरोजाबादमधील काच उद्योगावर संकट – CIABC च्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील काच उत्पादन केंद्रात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. कारखान्यांना आवश्यकतेच्या तुलनेत केवळ ६० टक्के गॅस पुरवठा होत असल्याने उत्पादकांना महागड्या स्पॉट LNG किंवा LPG वर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी काच बाटल्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली असून काही युनिट्स बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले. बिअर कॅन उत्पादनावरही परिणाम – मध्यपूर्वेतील तणावामुळे अॅल्युमिनियम पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे बिअर कॅनच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिस्थिती दीर्घकाळ कायम राहिल्यास काही उत्पादन प्रकल्प बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही उद्योग क्षेत्राने दिला आहे. करसवलतीचीही मागणी – वाढत्या खर्चाचा ताण कमी करण्यासाठी कंपन्यांनी राज्य सरकारांकडे तात्पुरत्या करसवलतीची मागणी केली आहे. BAI ने उत्पादन शुल्कात प्रति लिटर ३ ते ५ रुपयांची कपात करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच CIABC ने वाइन आणि IMFL च्या एक्स-डिस्टिलरी किंमतीत बदल करण्याची मागणी केली आहे.