Strait of Hormuz: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत इराणने मोठे पाऊल उचलत हॉर्मुज सामुद्रधुनीत चीनच्या दोन कंटेनर जहाजांना अडवून माघारी पाठवले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली असून, इराण-चीन संबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, चीनच्या मालकीची CSCL Indian Ocean आणि CSCL Arctic Ocean ही दोन मोठी कंटेनर जहाजे इराणच्या दक्षिणेकडील बंदर अब्बासजवळील लारक बेटाच्या परिसरात पोहोचली होती. मात्र, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) कडून इशारा मिळाल्यानंतर या जहाजांना यू-टर्न घ्यावा लागला. ही जहाजे चीनच्या सरकारी कंपनी COSCO द्वारे चालवली जात असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, इराणने इतर देशांच्या आणखी तीन कंटेनर जहाजांनाही परत पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. IRGC ची कडक भूमिका – IRGC ने स्पष्टपणे जाहीर केले आहे की, “हॉर्मुज सामुद्रधुनी सध्या बंद आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या सहयोगी देशांशी संबंधित कोणत्याही जहाजाला या मार्गाने जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.” इराणने यापूर्वीही इशारा दिला होता की, केवळ शत्रू देशांशी संबंधित जहाजांनाच अडवले जाईल. सध्या फक्त इराणसाठी आवश्यक वस्तू, जसे की औषधे, कपडे, वाहने आणि अन्नधान्य… घेऊन येणाऱ्या जहाजांना मर्यादित परवानगी दिली जात आहे. काही धान्यवाहू जहाजांना विलंबानंतर प्रवेश देण्यात आल्याचेही समजते. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मार्ग – हॉर्मुज सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची जलवाहतूक मार्गांपैकी एक आहे. जागतिक तेलपुरवठ्यापैकी सुमारे 20 टक्के तेल याच मार्गाने वाहतूक केले जाते. त्यामुळे या मार्गावरील तणाव वाढल्याने जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ लागले आहेत. फेब्रुवारी 2026 पासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे या भागातील परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे. इराणने यापूर्वीच हॉर्मुज सामुद्रधुनी बंद केल्याचे सांगितले होते. हेही वाचा – इराणने इस्रायलवर डागलेल्या क्षेपणास्त्रांवर लिहिले “Thank You India”; युद्धात भारताचा उल्लेख का? चीन-इराण संबंधांवर प्रश्नचिन्ह – चीन आणि इराण यांच्यातील संबंध पारंपरिकदृष्ट्या मजबूत मानले जातात. इराण आपल्या तेल निर्यातीपैकी सुमारे 90 टक्के तेल चीनला पुरवतो. याशिवाय, भूतकाळात चीनने इराणला शस्त्रास्त्रांचीही मदत केली आहे. मात्र, या घटनेनंतर चीनच्या जहाजांनाही माघारी फिरवावे लागल्याने दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलचा इशारा, अमेरिकेची हालचाल – दरम्यान, इस्रायलने इराणवर हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (पेंटागन) मध्य पूर्वेत आणखी 10,000 सैनिक पाठवण्याचा विचार सुरू केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणच्या ऊर्जा क्षेत्रावर थेट हल्ला टाळण्याचा निर्णय तिसऱ्यांदा पुढे ढकलल्याचेही समोर आले आहे. हॉर्मुज सामुद्रधुनीतील वाढता तणाव केवळ प्रादेशिक मर्यादेत न राहता जागतिक व्यापार आणि तेलपुरवठ्यावर परिणाम करत आहे. इराणच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, काल असे वृत्त आले होते की, इराणने भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराक यांसारख्या ५ “मित्र देशांची” यादी प्रसिद्ध केली आहे. इराणने या सर्व देशांना व्यापारी वाहतुकीसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. मात्र आता चीनची जहाजे माघारी पाठवल्याने तणाव वाढला आहे. याआधी भारताची एलपीजी जहाजे इराणने सोडली होती. आता यापुढे नेमका काय निर्णय होतो? चीन प्रमाणे भारताचीजी जहाजे अडवली जातील का की मुभा मिळेल हे पाहणे महत्वाचे आहे. जर भारताचीही जहाजे बंद केली तर मोठी इंधन टंचाई आणि दीर्घकाळ महागाईला देशाला सामोरे जावे लागेल.