दुबई – इराणने होरमुझच्या खाडीमध्ये दक्षिण कोरियाचा तेलवाहू टॅंकर पकडला आहे. पर्शियन आखातामध्ये आणि खाडीमध्ये तेलाचे प्रदुषण केल्याच्या आरोपावरून एमटी हॅनकुक चेरनी नावाची तेलवाहू नौका थांबवण्यात आली असल्याचे इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवरून प्रसिद्ध झालेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या नौदलाने हे तेलवाहू जहाज जप्त केले असल्याचे एका अन्य खासगी वृत्तसंस्थेनेही म्हटले आहे.
एमटी हॅनकुन चेरनी हे तेलवाहू जहाज सोमवारी दुपारी बंदार अब्बास बंदराजवळ असल्याचे उपग्रहाद्वारे उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. मात्र उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीचा अधिक तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.
एमटी हॅनकुक चेरनी हे दक्षिण कोरियाचे तेलवाहू जहाज सौदी अरेबियावरून संयुक्त अरब अमिरातीतील फौजाइराह येथे निघाले होते. जहाजाच्या मालकांशी त्वरित संपर्क होऊ शकलेला नाही. तसेच दक्षिण कोरियाकडूनही हे जहाज इराणकडून पकडले जाण्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.