Iran Protests: इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात आतापर्यंत किमान २,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हा आकडा १२,००० च्या पार गेल्याचा खळबळजनक दावा केला आहे. बिघडलेली आर्थिक स्थिती, गगनला भिडलेली महागाई आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत इराणी चलनात (रियाल) झालेली मोठी घसरण यामुळे जनतेचा संयम सुटला आहे. इराणमधील जवळपास १०० शहरांमध्ये हे आंदोलन पसरले असून आंदोलक थेट सत्ताधारी राजवटीच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. इराण सरकारने या मोठ्या प्रमाणावर झालेल्या मृत्यूंसाठी “दहशतवाद्यांना” जबाबदार धरले आहे. सरकारी आकडेवारीनुसार मृतांची संख्या २,००० असली, तरी ‘इराण इंटरनॅशनल’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा दलांच्या कारवाईत आतापर्यंत १२,००० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. आधुनिक इराणच्या इतिहासातील हे सर्वात मोठे हत्याकांड असल्याचे बोलले जात आहे. सुरक्षा यंत्रणांचे अंतर्गत रिपोर्ट्स, प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालयांतील डेटाच्या आधारे हा १२ हजारांचा आकडा समोर आल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. सुरक्षा दलांना गोळीबाराचे आदेश? मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या ‘सुप्रीम नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ने आंदोलकांवर गोळीबार करण्याची परवानगी सुरक्षा दलांना दिली होती. यामुळेच मृतांचा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इराणमधील कडक निर्बंधांमुळे नेमका आकडा स्पष्ट होण्यास अडचणी येत आहेत. भारत सरकारकडून ‘ट्रॅव्हल ॲडव्हायझरी’ जारी – इराणमधील बिघडती परिस्थिती पाहता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कडक पावले उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “आम्ही इराणमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. इराणमध्ये सध्या १०,००० भारतीय वास्तव्यास आहेत. ५ जानेवारी रोजीच आम्ही भारतीयांना इराणचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.” तसेच तिथे असलेल्या भारतीयांना निदर्शनं होत असलेल्या भागांपासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इराणमधील ही धुमसती परिस्थिती कधी शांत होणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.