Iran Protest: इराणमध्ये सध्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून, देशाचे चलन ‘रियाल’ अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरले आहे. सोमवारी एका डॉलरची किंमत १४ लाख २० हजार रियालपर्यंत पोहोचल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले असून, या महागाईच्या निषेधार्थ इराणमधील जनता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली आहे. राजधानी तेहरानसह इस्फहान, शिराज आणि मशहद यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये आंदोलकांनी निदर्शने केली. वाढत्या जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या केंद्रीय बँकेचे प्रमुख मोहम्मद रजा फरजिन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर केला आहे. २०२२ मधील महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आंदोलनानंतरचे हे सर्वात मोठे आंदोलन मानले जात आहे. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदवला असून, उर्वरित व्यावसायिकांनाही यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. चलनाचे अवमूल्यन झाल्यामुळे अन्नधान्य आणि रोजच्या वापराच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच सरकारने पाच वर्षांनंतर पेट्रोलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने आगीत तेल ओतण्याचे काम झाले आहे. नव्या नियमांनुसार पेट्रोलसाठी त्रिस्तरीय किंमत रचना लागू करण्यात आली असून, यामुळे सर्वसामान्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दुसरीकडे, सरकार आगामी वर्षात व्हॅट (VAT) १० टक्क्यांवरून १२ टक्के करण्याच्या आणि कर महसुलात ६२ टक्क्यांनी वाढ करण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड भीती आणि असंतोष पसरला आहे. २०१५ च्या अणुकरारावेळी रियालची स्थिती तुलनेने चांगली होती, मात्र २०१८ मध्ये अमेरिकेने या करारातून माघार घेतल्यापासून इराणच्या अर्थव्यवस्थेची घसरण सुरू झाली. या गंभीर परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी गृहमंत्र्यांना आंदोलकांच्या रास्त मागण्या ऐकून घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र बाजारपेठेतील व्यापारी आणि सामान्य जनता आजही रस्त्यावर ठाम आहे.