Iran Israel War : मध्य पूर्वेतील संघर्षाने भीषण रूप धारण केले असून, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात (Iran Israel War) दोन्ही बाजू माघार घेण्यास तयार नाहीत. अमेरिकेच्या सक्रिय सहभागामुळे हे युद्ध आता पूर्णक्षमतेने सुरू झाले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला असून, जगभरातून या घटनेचा संताप व्यक्त होत आहे. खामेनेई यांच्या ‘शहादत’नंतर इराणने (Iran Israel War) अधिक आक्रमक भूमिका घेतली असतानाच, आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे – माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचाही इस्रायली हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अहमदीनेजाद यांचा हल्ल्यात मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणचे माजी राष्ट्रपती (२००५-२०१३) महमूद अहमदीनेजाद यांचा मृत्यू झाला आहे. तेहरानच्या उत्तर-पूर्व भागातील नर्मक (Narmak) परिसरातील त्यांच्या निवासस्थानावर शनिवारी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अहमदीनेजाद यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे जवान आणि इतर काही जवळचे सहकारीही ठार झाले. अहमदीनेजाद हे Expediency Discernment Council चे सदस्य होते आणि ते एका इमारतीत आपल्या टीमसोबत आश्रय घेत होते. इराणच्या ILNA सारख्या सरकारी माध्यमांनी हे वृत्त दिले असून, काही माध्यमांनी ते ‘शहादत’ म्हणून वर्णन केले आहे. मात्र, काही रिपोर्ट्समध्ये अधिकृत पुष्टी अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर विध्वंसाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात इमारतीचा मोठा नुकसान दिसत आहे. काही दाव्यांनुसार, या हल्ल्यात दोन शाळकरी मुलांचाही मृत्यू झाला आहे. इराणचा कठोर इशारा: जशास तसे उत्तर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या हल्ल्यांना तीव्र प्रतिसाद दिला आहे. त्यांनी म्हटले की, “आम्ही जशास तसे उत्तर देत राहू. अमेरिका आणि इस्रायलच्या लष्करी तळांना उद्ध्वस्त करत राहू.” इराणने प्रतिशोध हा आपला कायदेशीर हक्क असल्याचे सांगितले आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणने आधीच कुवेत, कतार, इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) येथील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.