Strait of Hormuz Crisis: अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसतानाच, इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने (IRGC) होर्मुझच्या सामुद्रधुनीत मोठी लष्करी कारवाई केली आहे. सागरी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत इराणने दोन व्यापारी जहाजे जप्त केली असून, त्यापैकी एक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदराच्या दिशेने येत होते. नेमकी घटना काय? इराणची निमलष्करी संस्था ‘रिव्होल्यूशनरी गार्ड्स’च्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एमएससी फ्रांसेस्का’ (MSC Francesca) आणि ‘एपामिनोड्स’ (Epaminodes) अशी जप्त केलेल्या जहाजांची नावे आहेत. या जहाजांनी सागरी नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा इराणने केला असून, कारवाईनंतर दोन्ही जहाजे इरानी किनारपट्टीवर नेण्यात आली आहेत. एपामिनोड्स (Epaminodes) हे जहाज लायबेरियाच्या ध्वजाखाली कार्यरत असून ते दुबईहून भारताकडे येत होते. गुजरातच्या मुंद्रा बंदरात हे जहाज पोहोचण्यापूर्वीच इराणने ते ताब्यात घेतले. एमएससी फ्रांसेस्का (MSC Francesca) या जहाजावर पनामाचा ध्वज असून ते देखील इराणच्या ताब्यात आहे. कारवाईचे कारण काय? इराणच्या ‘तसनीम’ या निमसरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालानुसार, ही जहाजे कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय त्या क्षेत्रात कार्यरत होती. तसेच त्यांनी आपल्या ‘नेव्हिगेशन सिस्टम’मध्ये फेरफार केल्याचा आरोप इराणने केला आहे. यामुळे सागरी सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे सांगत आयआरजीसीने ही कारवाई समर्थनीय ठरवली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता – होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. इराणने यापूर्वीच जाहीर केले होते की, या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला आयआरजीसीची परवानगी घेणे बंधनकारक असेल. अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केलेली असतानाही इराणने केलेल्या या आक्रमक कारवाईमुळे कच्च्या तेलाचा पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.