‘मोसाद’च्या 4 एजंटांना इराणने दिली ‘फाशी’

तेहरान – इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादला मदत केल्याच्या आरोपावरून इराणने चार जणांना फाशी दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने इराणच्या मिजान या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. मिजानच्या बातमीनुसार इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने इस्त्रायलच्या मोसाद संघटनेशी संबंधित असलेल्या लोकांची माहिती दिली होती.
खासगी आणि सरकारी स्वरूपाची माहिती चोरून ती इस्त्रायलला पुरवण्याचे काम हे लोक करत होते. त्यानंतर शुक्रवारी पहाटे चार जणांना फाशी देण्यात आली आहे. इराण आणि इस्त्रायल हे कट्टर शत्रू आहेत. गेल्या काही काळापासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या रक्तरंजीत संघर्षामुळे इराण- इस्त्रायल संबंधांतील कटुता आणखीनच वाढली आहे.
हिज्बुल्लाहमुळे तणावात वाढ
लेबनान येथील इराणच्या पाठिंब्यावर काम करणारी हिज्बुल्लाह ही संघटना इस्त्रायल आणि हमास यांच्या संघर्षात उघडपणे हमासच्या बाजूने उतरली आहे. इस्त्रायल हमास युध्द सुरू झाल्यापासून हिज्बुल्लाह इस्त्रायलवर आक्रमण करते आहे. त्यांनी इस्त्रायलच्या तळांवर कालच रॉकेट डागले होते आणि गोळीबाराच्याही घटना घडत आहेत. इस्त्रायलनेही लेबनानच्या सीमेलगतच्या भागात धडक मोहीम सुरू केली असून त्यात हिज्बुल्लाहचे अनेक दहशतवादी आणि त्यांचे म्होरके मारले गेले आहेत.
दरम्यान, येमेनच्या हुती बंडखोरांनाही आश्रय दिल्याचा इराणवर आरोप आहे. सध्या लाल समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमुळे हुती बंडखोरही चर्चेत आले आहेत. हुतींनी हमासला पाठिंबा दर्शवला असून त्याचाच एक भाग म्हणून समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना ते लक्ष्य करत आहेत. इराणमध्ये फाशीची शिक्षा ही सामान्य बाब आहे.
१६ डिसेंबर रोजीही मोसादसाठी काम करत असल्याच्या आरोपावरून एका व्यक्तीला फाशी देण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही याच आरोपांवरून चार जणांना फासावर लटकवले गेले होते. उपलब्ध असलेल्या एका आकडेवारीनुसार २०१० पासून आतापर्यंत इराणमध्ये ६८ अल्पवयीनांना फाशी देण्यात आली आहे.





