Iran-US Tension : होर्मुज मार्ग पुन्हा खुला होण्याची शक्यता; इराण-अमेरिका शांतता कराराच्या मसुद्यावर प्राथमिक सहमती
Iran-US Tension : दरम्यान, पुढील ६० दिवसांत अंतिम करारावर शिक्कामोर्तब झाल्यास तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंधनकारक ठरावाच्या स्वरूपात मंजूर केला जाऊ शकतो, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

Iran-US Tension : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेमध्ये शांतता कराराच्या प्राथमिक मसुद्यावर सहमती झाल्याचा दावा इराणने केला आहे. या संभाव्य करारामुळे जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुज सामुद्रधुनी मार्ग पुन्हा पूर्ववत खुला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच समुद्री नाकेबंदी संपुष्टात येण्याचे संकेतही मिळत आहेत.
नेमकं काय ठरलं?
इराणी सरकारी दूरचित्रवाणीने दिलेल्या माहितीनुसार, या मसुद्यानुसार इराण एका महिन्याच्या आत होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक युद्धपूर्व स्तरावर आणण्यास तयार झाला आहे. त्याबदल्यात अमेरिका इराणच्या आसपास तैनात केलेली सैन्य ताकद कमी करेल आणि नौदल नाकेबंदी हटवेल, असे प्रस्तावित करण्यात आले आहे.
इराणची वृत्तसंस्था ‘मिजान’ने या प्रस्तावाचे अधिक तपशील जाहीर केले असून, हा बहु-स्तरीय शांतता प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेने इराणलगतच्या भागातून सैन्य मागे घेण्याचे आश्वासन दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रक्रियेत केवळ अतिरिक्त सैन्य माघारी घेतले जाणार की विद्यमान तळांवरील सैनिकसंख्येतही कपात होणार, याबाबत पुढील चर्चेत निर्णय होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, पुढील ६० दिवसांत अंतिम करारावर शिक्कामोर्तब झाल्यास तो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बंधनकारक ठरावाच्या स्वरूपात मंजूर केला जाऊ शकतो, असेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
याआधी संघर्षविराम लागू असतानाही अमेरिका आणि इराण यांच्यात तणावपूर्ण घटना घडल्या होत्या. मे महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणी लष्करी ठिकाणांवर हल्ले केले होते. इराणने अमेरिकन युद्धनौकांवर क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि लहान नौकांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता.
होर्मुज सामुद्रधुनी हा जागतिक तेलवाहतुकीसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा समुद्री मार्ग मानला जातो. या परिसरातील कोणत्याही लष्करी हालचालींचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय तेलबाजार आणि जागतिक राजकारणावर होत असतो. त्यामुळे या भागावर अमेरिकेची सतत नजर असते.
ट्रम्प यांचा प्रस्ताव –
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या संवर्धित युरेनियमसंदर्भातही महत्त्वपूर्ण विधान केले. इराणने संवर्धित युरेनियम अमेरिकेकडे सुपूर्द करावे, जेणेकरून ते नष्ट करता येईल, किंवा इराणसोबत संयुक्तरीत्या त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असा प्रस्ताव ट्रम्प यांनी मांडला.
ट्रम्प यांनी दोन्ही देशांतील अणुकरारासंदर्भातील चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे सांगितले. तर, इराणनेही काही मुद्द्यांवर सहमती झाल्याचे मान्य केले असले, तरी अमेरिकन अधिकाऱ्यांची वारंवार बदलणारी भूमिका चर्चेला गुंतागुंतीची बनवत असल्याचे म्हटले आहे.





