US-Iran Talks: पश्चिम आशियातील वाढत्या सुरक्षा तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज रात्री इस्लामाबादमध्ये दाखल होणार असल्याची माहिती पाकिस्तानमधील एआरवाय न्यूजचे अध्यक्ष कमरान खान यांनी दिली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या सविस्तर दूरध्वनी चर्चेनंतर हा दौरा निश्चित झाल्याचा दावा त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमधून केला आहे. मात्र, या दौऱ्याबाबत इराणच्या अधिकृत माध्यमांकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अराघची यांच्यात प्रादेशिक परिस्थिती व युद्धविरामाच्या मुद्द्यांवर दूरध्वनीद्वारे चर्चा झाली, परंतु शिष्टमंडळाच्या भेटीचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अराघची यांनी इशाक डार आणि आसिम मुनीर यांच्याशी स्वतंत्रपणे संवाद साधल्याचे सांगितले आहे. दरम्यान, प्रादेशिक परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी सुरू असलेल्या संघर्षाच्या तोडग्यासंदर्भात कोणतीही वेळमर्यादा देण्यास नकार दिला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी “घाई करू नका” असे स्पष्ट करत, तेहरानमध्ये स्पष्ट नेतृत्वाच्या अभावामुळे चर्चेत अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप केला. यापूर्वी मंगळवारी ट्रम्प यांनी इराणबरोबरचा युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली होती. इराणच्या नेतृत्वाला चर्चेसाठी एकत्रित प्रस्ताव तयार करण्यासाठी अधिक वेळ देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. इराण सरकारमध्ये अंतर्गत मतभेद असल्याची बाब लक्षात घेऊन तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेतल्याचेही ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. एकूणच, इराण-पाकिस्तान संवाद वाढत असतानाच या संभाव्य दौऱ्याबाबत अधिकृत स्पष्टता येणे बाकी असून, प्रादेशिक घडामोडींवर त्याचा परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.