Iran Israel War : मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षात इराणने इस्रायलवर मोठा प्रतिहल्ला केल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने तेल अवीवमधील इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयासह हवाई दलाच्या तळाला लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. IRGCच्या निवेदनानुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर आणि इस्रायली हवाई दलाच्या कमांडरच्या तळावर क्षेपणास्त्र डागण्यात आले. काही वृत्तांत ‘खैबर’ क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर नेतन्याहू यांच्या प्रकृतीबाबतही दावे करण्यात आले आहेत. मात्र, इस्रायल सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयावर कोणताही हल्ला झालेला नसल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या दाव्यांना स्वतंत्र दुजोरा मिळालेला नसून परिस्थितीबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूबाबतच्या वृत्तांनंतर संघर्ष अधिक चिघळल्याचे सांगितले जात आहे. इराणकडून इस्रायली शहरांवर तसेच आखाती भागातील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लष्करी अधिकाऱ्यांना हल्ले थांबवण्याचे आणि आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेची लष्करी कारवाई उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत सुरू राहील, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, दोन्ही देशांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत असल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती तणावपूर्ण असून अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा केली जात आहे.