Iran : शाळेतील विद्यार्थिनींवर विषप्रयोग केल्याप्रकरणी 100 जणांना अटक, समोर आले धक्कादायक कारण…

तेहरान – शाळेतील विद्यार्थिनींवर विषप्रयोग केल्याप्रकरणी इराणमधील 100 जणांना अटक करण्यात आली आहे. मुलींवर विषप्रयोग करण्यामागे काही गुप्त गटांचा हात असावा, असा दावाही प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंरपासून इराणमधील शाळांमधील अनेक विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ आणि चक्कर येण्यासारखा त्रास होतो आहे. शाळांच्या आवारामध्ये काही तरी वाईट वास येत असल्याची तक्रारही अनेक मुलींनी केली होती. या कथित विषप्रयोगामुळे अनेक मुलींना रुग्णालयात दाखल देखील करावे लागले होते.
इराणमधील एका उपमंत्र्याने या विषप्रयोगाचा गौप्यस्फोट केल्यानंतर यासंदर्भात देशभर खळबळ माजली होती. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला आणि सुमारे 100 जणांना अटक करण्यात आल्याचे इराणच्या “आयआरएनए’ या सरकारी वृत्तसंस्थेने गृहमंत्र्यांच्या हवाल्याने प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
United Nations : सुरक्षा परिषदेचा विस्तार आवश्यक – रुचिरा कंबोज
अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही गुप्त गटांचे सदस्य आहेत. शाळांमध्ये आणि शाळांशी संबंधित असलेल्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी हा विषप्रयोग केल्याचा संशय आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे. गेल्या आठवड्यांपासून शाळांमधील विषप्रयोगाच्या घटनांमध्ये घट झाली आहे. कोणत्याही शाळांमधील विद्यार्थिनी आजारी पडल्याचे वृत्त नसल्याचेही इराणच्या गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.





