अहमदाबाद -यंदाच्या आयपीएल मोसमातही कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फक्त एक विजय मिळवून ते गुणतालिकेत तळाला आहेत. यामुळे स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी सोमवारी पंजाब किंग्जविरोधात होणाऱ्या लढतीत त्यांना विजय आवश्यक आहे. दुसरीकडे पंजाबही विजयी मालिका कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असेल.
पंजाब संघातील फलंदाजी मजबूत झाली असून, कर्णधार केएल राहुलकडूनही चांगली कामगिरी होत आहे. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद 60 धावांची निर्णायक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता. तसेच सलामीवीर मयंक आग्रवालही फॉर्मात आहे. याशिवाय ख्रिस गेलनेही गत सामन्यात नाबाद 43 धावांची खेळी करत पुन्हा फॉर्मात येत असल्याचे संकेत दिले असल्याने पंजाबसाठी ही चांगली बाब आहे.
पंजाबला ही विजयी लय कायम राखयची असेल तर दीपक हुड्डाला त्याच्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. तसेच निकोलस पुरनदेखील चार सामन्यात अपयशी ठरला आहे. गोलंदाजीबाबत सांगायचे झाल्यास पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबईविरोधात चांगले प्रदर्शन केले होते. या सामन्यात रवी बिश्नोई आणि महंमद शमीने संघास विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. तसेच युवा गोलंदाज अर्शदीप सिंहनेदेखील पाच सामन्यात 6 विकेट घेत चांगले प्रदर्शन केले आहे.
दुसरीकडे कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ कामगिरीत सुधारणा करण्यात अपयशी ठरला आहे. गत सामन्यात त्यांना राजस्थानकडून 6 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. कोलकाताला ही अपयशाची मालिका खंडित करायची असेल, तर फलंदाजांना सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करावे लागणार आहे. अद्याप आघाडीचे फलंदाज संघाला दमदार सलामी देऊ शकलेले नाहीत. यामुळे कोलकाताला विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागणार आहे.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर