#IPL2021 : …अन् मिळाले आयपीएलला बळ

पुणे – करोनामुळे जवळपास दहा महिने ठप्प झालेले देशांतर्गत क्रिकेट सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेद्वारे सुरू झाले. ही स्पर्धा खरेतर बीसीसीआयसाठी आयपीएल स्पर्धेचा ट्रेलर ठरली. करोनाच्या सावटातही स्पर्धा यशस्वी होतील का, हे पाहण्याची बीसीसीआयची युक्ती कामी आली व त्यामुळेच यंदाची आयपीएल स्पर्धा भारतातच होणार या शक्यतेला बळही मिळाले आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे.
गेल्या मार्च महिन्यापासून जगभरात करोनाने कहर केला. त्यामुळेच भारतातही लॉकडाऊन केला गेला होता. त्यामुळे क्रिकेटच नव्हे तर सर्व क्रीडा क्षेत्रही ठप्प झाले होते. त्यानंतर जगात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये क्रिकेट सुरू झाले व त्यानंतर आखातात करोनाचा धोका कमी झाल्यामुळे गेल्या वर्षीची आयपीएल स्पर्धा देखील अमिरातीतच खेळवली गेली. त्यानंतर लगेचच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला व एक शाश्वत परिस्थिती निर्माण झाली. तरीही भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशात क्रीडा स्पर्धा सुरू करणे धोकादायकच होते. मात्र, भारतातील करोनाचा धोकाही अत्यंत अल्प प्रमाणावर राहिल्यामुळे बीसीसीआयने आगामी मालिका तसेच आयपीएल स्पर्धेसाठी चाचपणी करायचे निश्चित करत सर्वप्रथम सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेचा शुभारंभ केला.
हा देशातील करोनाची चाचपणी करण्यासाठी केलेला ट्रेलर होता. आता मायदेशातील इंग्लंडविरुद्धची मालिका व त्यानंतरची यंदाची आयपीएल हा खरा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्यातरी आयपीएल स्पर्धेचे साखळी सामने महाराष्ट्रात तर बाद फेरीचे सामने अहमदाबादेत होण्याची शक्यता वाढली आहे. येत्या शुक्रवारपासून सुरू होणारी इंग्लंडविरुद्धची कसोटी, एकदिवसीय व टी-20 मालिकाही ठरावीक केंद्रांवरच होणार आहे. पहिले दोन कसोटी सामने चेन्नईत, तर, उरलेले दोन कसोटी सामने व पाच टी-20 सामन्यांची मालिका अहमदाबादमध्ये होणार आहे. तीनही एकदिवसीय सामने पुण्यात होतील. देशात मोठ्या प्रमाणावर मैदाने असली तरीही महाराष्ट्राबाबत एक मोठी संधी आहे. कारण राज्यातील सर्व प्रमुख मैदाने एकमेकांपासून फार लांब नसल्याने बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेसाठी दोनच केंद्रे निश्चित केली आहेत. रोटेशन पद्धतीनुसार सर्व राज्यांना विविध सामने आयोजित करण्याचा मान मिळतो. मात्र, यंदा ही रोटेशन पद्धती गुंडाळून ठेवली गेली असून करोनाचा धोका कमी असलेल्या व खेळाडूंना प्रवासाच्या दृष्टीने सोपे ठिकाण मिळावे या हेतूने यंदाची आयपीएल महाराष्ट्र व गुजरात या दोनच केंद्रांवर खेळवली जाणार आहे.
रणजी स्पर्धेचा बळी
भारतीय क्रिकेटमध्ये अत्यंत मानाची समजली जात असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा गेल्या 87 वर्षांत प्रथमच बळी दिला गेला आहे. त्याएवजी विजय हजारे करंडक एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आता आयपीएलसाठी हा सगळा खटाटोप आहे हे वेगळे सांगायला नको. मात्र, तरीही एक प्रश्न उरतो की, जर हजारे स्पर्धा यंदा खेळवली तर मग भारतीय संघाच्या निवडीचा निकष काय राहील. कारण देशात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांतीलच नव्हे तर रणजी स्पर्धेतील कामगिरीच्या निकषावरच भारतीय संघाची निवड केली जाते. असे अनेक प्रश्न निर्माण होत असून याची उत्तरे निवड समिती व बीसीसीआयला द्यावी लागणार आहेत.





