अमिराती सरकार व अमिराती क्रिकेट संघटना घेणार निर्णय दुबई –आबूधाबीत सध्या प्रचंड उष्ण वातावरण असल्याने तेथे सामने खेळविण्यासाठी आयपीएल समिती तयार नाही. त्यामुळे तेथे होणारे सर्व सामने दुबई व शारजात आयोजित करण्याचे बीसीसीआयचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत येत्या रविवारपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. आबूधाबी सरकारच्या नियमामुळे येथे दाखल होणार असलेल्या संघांना 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार असल्याने त्याचा स्पर्धेच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार असल्याने आता आयपीएल समिती व बीसीसीआयचे पदाधिकारी अमिराती सरकारशी बोलणी करणार आहेत. 14 दिवसांच्या विलगीकरणाच्या नियमामुळे स्पर्धेच्या वेळापत्रकाला विलंब होत आहे. त्यामुळे आबूधाबीमधील सर्व सामने दुबई आणि शारजा या दोन शहरांमध्ये घेतले जाण्याची शक्यता वाढली आहे. स्पर्धेसाठी दाखल झालेल्या व दुबईत वास्तव्य असलेल्या संघातील खेळाडूंच्या सरावाला प्रारंभ झाला असून अमिराती सरकारने विलगीकरणाचा कालावधी कमी केला तरच तेथे सामन्यांचे आयोजन करणे शक्य होणार आहे. दुबईत विलगीकरण कालावधी सात दिवसांचाच असल्याने त्याचा खेळाडूंना फारसा त्रास होणार नाही. आबूधाबीत दाखल झालेल्या मुंबई व कोलकाता संघाला विलगीकरणाच्या नियमाचा फटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांचा कालावधी संपल्याशिवाय स्पर्धेचे वेळापत्रकही तयार होणे कठीण आहे. ही स्पर्धा येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. 56 साखळी सामन्यांपैकी प्रत्येकी 21 सामने आबूधाबी आणि दुबईत होणार होते, तर 14 सामने शारजात होणार होते. शारजातून दुबईत किंवा दुबईतून शारजात प्रवेश करताना कोणतीही अडचण येत नाही; परंतु आबूधाबीत करोना चाचणी करावी लागत असल्याने खेळाडूंसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विलगीकरणाचा कालावधी 14 दिवसांवरून 7 दिवस करण्यासंदर्भात अमिराती क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून येथील प्रशासनाशी चर्चा सुरू आहे, असे आयपीएलच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे.