#IPL2019 : राजस्थानचा बंगळुरूवर सात गडी राखून विजय

जयपूर – गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीनंतर फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी आणि एक चेंडू राखून पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला.

बंगळुरूने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 158 धावांची मजल मारत राजस्थानसमोर विजयासाठी 159 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना राजस्थानने दमदार सुरुवात केली. कर्णधार अजिंक्‍य रहाणे आणि जोस बटलर यांनी 8 षटकांत 60 धावांची सलामी दिली. मात्र, चहलने रहाणेला बाद करत ही जोडी फोडली. रहाणे बाद झाल्यानंतर बटलने स्टिव्ह स्मिथच्या जोडीने वेगाने पाठलाग करायला सुरुवात केली. मात्र 59 धावा करुन बटलर बाद झाला. यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि राहुल त्रिपाठी यांनी 50 धावांची भागिदारी करत राजस्थानला विजयाच्या जवळ पोहोचवले. विजयासाठी 5 धावा राहिल्या असताना स्मिथ बाद झाला. यानंतर स्टोक्‍स आणि राहुलने राजस्थानच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, बंगळुरूच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांमध्ये 48 धावांची मजल मारून देत चांगली सुरुवात करून दिली. मात्र, श्रेयस गोपालने आपल्या पहिल्याच षटकांत विराट कोहलीचा त्रिफळा उडविला. यावेळी विराट आणि पार्थिवने पहिल्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. यानंतर आलेल्या ए.बी. डीव्हिलियर्सने पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करत बंगळुरूची धावगती वाढविण्यास सुरुवात केली.

मात्र, गोपालने आपल्या पुढच्याच षटकांत डीव्हिलियर्सला बाद करत बंगळुरूला दुसरा धक्‍का दिला. यानंतर, पार्थिव आणि स्टोइनिसने फटकेबाजी करत बंगळुरूची धावसंख्या वाढवली. बंगळुरूने शतकी वेस ओलांडल्या नंतर पार्थिव 67 धावांची खेळी करुन बाद झाला. यानंतर मोइन अली आणि स्टोइनिसने बंगळुरूला 158 धावांची मजल मारून दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.