अखेरच्या साखळी सामन्यात राजस्थानवर 5 गडी राखून विजय
नवी दिल्ली – राजस्थानने दिलेल्या माफक आव्हान यशस्वीपणे पार करत दिल्लीने गुणतालिकेत पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. घरच्या मैदानावर खेळताना राजस्थान रॉयल्सवर 5 गडी राखून मात करत दिल्लीने साखळी फेरीचा अखेर विजयाने केला आहे. याचसोबत राजस्थान रॉयल्सचे या सत्रातील आव्हान संपुष्टात आले आहे.
दिल्लीने प्रथम राजस्थान रॉयल्सला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 115 धावांवर रोखले. त्यानंतर माफक लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातील दिल्लीचीही तारांबळ उडाली. पण, ऋषभ पंतने चिवट खेळ करताना दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ऋषभने 38 चेंडूंत 2 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 53 धावांची खेळी केली.
राजस्थानकडून इश सोढीने दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांना माघारी धाडत चांगली सुरुवात केली होती. त्याला श्रेयस गोपालनेही चांगली साथ दिली. मात्र मधल्या फळीत ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिल्लीचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ईशांत शर्मा आणि अमित मिश्रा यांनी दिलेल्या धक्क्यातून राजस्थान रॉयल्सला सावरता आले नाही.
राजस्थानच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे मोठा फटका खेळताना स्वस्तात माघारी परतला. सलामीवीर लिआम लिव्हिंगस्टोन याने चांगली सुरुवात केली होती, पण 1 चौकार आणि 1 षटकार खेचत 14 धावांवर तो त्रिफळाचीत झाला आणि राजस्थानला दुसरा धक्का बसला.
त्याच्या पाठोपाठ संजू सॅमसनही धावचीत झाला. महिपाल लोमरोर आणि संजू सॅमसन यांच्यात काहीसा गोंधळ झाल्याने त्याला माघारी परतावे लागले. त्याने 5 धावा काढल्या. नव्या दमाचा महिपाल लोमरोर याला मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती. पण तो बाहेरच्या चेंडूला बॅट लागल्याने झेलबाद झाला. त्याने 8 धावा केल्या.
त्याआधी दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राची हॅटट्रीक घेण्याची संधी हुकली. श्रेयस गोपाल आणि पाठोपाठ स्टुअर्ट बिन्नी असे 2 चेंडूत अमित मिश्राने 2 बळी टिपले. गोपालने 12 धावा केल्या, तर बिन्नी पहिल्याचे चेंडूवर बाद झाला. त्याला हॅटट्रिकची संधी होती. तिसऱ्या चेंडूवरदेखील मिश्राने टाकलेला चेंडू हवेत उंच उडाला. पण ट्रेंट बोल्टने झेल सोडला. कृष्णप्पा गौतम मोठा फटका खेळताना माघारी परतला. त्याने एका चौकारासह 6 धावा केल्या. आजच्या सामन्यात संधी मिळालेला ईश सोधी 6 धावा करून बाद झाला.
दुसरीकडे, रियान परागने एकतर्फी खिंड लढवून 49 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 50 धावांची खेळी केली. यासह आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा मान रियानने पटकावला. परागने 17 वर्षे 178 दिवस असताना अर्धशतक झळकावले. त्याने संजू सॅमसनचा 18 वर्षे 169 दिवसांचा विक्रम मोडला. दिल्लीकडून ईशांत शर्मा आणि अमित मिश्राने प्रत्येकी 3-3, तर ट्रेंट बोल्टने 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 9 बाद 115 (अजिंक्य रहाणे 2, लिआम लिव्हिंगस्टोन 14, श्रेयस गोपाल 12, रियान प्रयाग 50. ईशांत शर्मा 38.3, अमित मिश्रा 17-3, ट्रेंट बोल्ट 27-2).
दिल्ली कॅपिटल्स – 16.1 षटकात 5 बाद 121 (शिखर धवन 16, श्रेयस अय्यर 15, ऋषभ पंत नाबाद 53, कॉलिंग इग्राम 12, अक्षर पटेल नाबाद 1. ईश सोढी 26-3, श्रेयस गोपाल 21-2)