आयोजनाबाबतचे कवित्व संपले; बीसीसीआय पर्याय शोधणार मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविल्याचे जाहीर झाल्यावर लगेचच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाची इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात अद्याप मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी अधिकृतरीत्या जाहीर केलेला नसला तरीही आता पुढील किमान 4 महिन्यात तरी स्पर्धेचे आयोजन करणे शक्य होणार नसल्याचेही संकेत मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने दिले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले आयपीएलबाबतचे कवित्व संपुष्टात आले आहे. करोनाचा धोका वाढल्याने 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता या तारखेपासूनही ही स्पर्धा होण्याची शक्यता संपली आहे. आता पुढील दोन महिन्यांत सर्व परिस्थितीचा आढवा घेतल्यानंतर जुलैमध्ये किंवा ऑस्ट्रेलियात होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली तर सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत स्पर्धा घेता येईल का याचीही चाचपणी केली जाणार आहे, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले होते. मंगळवारी पंतप्रधानांनी देशभरात लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवल्याचे जाहीर केले त्यामुळे यंदाच्या मोसमातील आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मंडळाने गेल्या एक महिन्यात स्पर्धेच्या आयोजनाबाबतच्या अनेक पर्यायांवर विचार केला होता. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर, ही स्पर्धा यंदा रद्दच करावी लागेल व त्याचे आयोजन पुढील वर्षी केले जाईल. तोटा होणारच….. आयपीएल कधी होईल हे आता सांगता येणार नाही. मात्र, ही स्पर्धा पुढे ढकलली काय किंवा रद्द केली काय या दोन्ही निर्णयामुळे मंडळाला, संघ मालकांना तसेच खेळाडूंना तोटा होणारच आहे. पुढील वर्षी जर स्पर्धा घेण्याचा निर्णय झाला तर खेळाडूंचे लिलाव मात्र होणार नाहीत. त्यांचे यंदाच्या लिलावातील करार कायम राहतील. अर्थात याबाबतचा निर्णय संघ मालक घेतील, असेही संकेत मिळत आहेत.