राजस्थान रॉयल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ -सवाई मानसिंग मैदान, जयपुर
जयपुर -इंडियन प्रिमियर लीगच्या बाराव्या हंगामात आपल्या तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्स समोर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान असणार आहे. दोन्ही संघ सध्या क्रमवारीत तळाच्या स्थानी असून आपल्या पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत.
मोसमाच्या पहिल्याच सामन्यापासून बंगळुरूच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली असून मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्या व्यतिरिक्त इतर एकाही सामन्यात त्यांच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना चमक दाखवता आली नाही. त्यात आपल्या पहिल्या सामन्यात चेन्नई विरुद्ध त्यांचा संघ केवळ 70 धावांमधे संपुष्टात आला होता. तर, हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात केवळ 113 धावांमध्येच संपुष्टात आला. या दोन्ही सामन्यात त्यांचा संघ संपुर्ण 20 षटके फलंदाजी करु शकले नाही. तर, मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी सुमार कामगिरी नोंदवली. ज्यात मुंबई विरुद्ध 187 तर सनरायजर्स हैदराबादच्या संघा विरुद्ध 231 धावांची खैरात त्यांनी वाटली आहे. यातच त्यांच्या संघाकडून विराट कोहली, ए.बी. डीव्हिलियर्स, पार्थिव पटेल, शिमरॉन हेटमायर, मोईन अलीसारखे एका पेक्षा एक तगडे फलंदाज असताना एकाही फलंदाजाला लक्षात राहण्यासारखी अथवा विजय मिळवून देणारी कामगिरी करता आली नाही.
तर, दुसरीकडे आपल्या पहिल्या सामन्यापासून फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतरही गोलंदाजांनी ऐनवेळी कच खाल्यामुळे तीनही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघासमोर स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे. यावेळी राजस्थानचा संघ आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध विजयी मार्गावर असताना अखेरच्या काही षटकांमध्ये फलंदाजांच्या हिराकिरीमुळे पराभुत झाला होता. तर, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या संघाने खराब सुरूवातीनंतर पुन्हा एकदा विजयाच्या आशा जागृत करत अखेरच्या सत्रात खराब कामगिरी नोंदवल्याने पराभुत होण्याची वेळ त्यांच्या वर आली होती. त्यातच त्यांनी मोठी किंमत मोजुन विकत घेतलेला महागडा गोलंदाज जयदेव उनाडकत हा तिनही सामन्यात महागडा ठरला असून तीन सामन्यांमध्ये मिळून त्याने दहा षटके गोलंदाजी करत 124 धावांची खैरात देत केवळ दोन गडी बाद केले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर गोलंदाजांच्या अपयशाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे आज जर राजस्थानला विजय मिळवायचा असेल तर त्यांच्या संघातील सर्व गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
प्रतिस्पर्धी संघ –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्रीच क्लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.
राजस्थान रॉयल्स – अजिंक्य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.