IPL 2025 Mega Auction : आजपासून पुढील दोन दिवस आयपीएल 2025 साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह येथे सुरू झाला आहे. सर्व 10 फ्रँचायझी पुढील आयपीएल हंगामापूर्वी त्यांचे संघ तयार करण्यात व्यस्त आहेत. या लिलावात एकूण 577 खेळाडूंचा समावेश आहे.
यावेळचा लिलाव खूप खास आहे, कारण यात जागतिक क्रिकेटचे अनेक मोठे स्टार खेळाडू उपस्थित आहेत. ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जोस बटलर, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, मिचेल स्टार्क, केएल राहुल, युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज सारखे मेगा स्टार IPL 2025 च्या मेगा लिलावात आहेत.
1. पहिली बोली अर्शदीप सिंगवर
आयपीएल (IPL 2025) च्या मेगा लिलावात पहिली बोली अर्शदीप सिंगवर लावली गेली. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा मार्की खेळाडूंच्या सेटचा एक भाग होता. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. अर्शदीपला पंजाब किंग्जने सोडले होते आणि पंजाब किंग्जनेच अर्शदीप सिंगसाठी मोठी रक्कम मोजली. अर्शदीपला पंजाब किंग्सने 18 कोटी रुपयांना विकत घेतले यासाठी पंजाबने आरटीएम कार्ड वापरले.
मार्की खेळाडू म्हणजे काय…?
मार्की खेळाडू हे असे खेळाडू आहेत ज्यांना लिलावापूर्वी विशेष लक्ष दिले जाते. खेळाडूंची क्षमता, प्रतिष्ठा आणि मागील कामगिरीच्या आधारावर त्यांची निवड केली जाते. मार्की खेळाडूंची एक विशेष यादी तयार केली जाते, ज्यामुळे हे खेळाडू लिलावात जास्त किंमतीला विकले जातात.
मार्की खेळाडू हे असे खेळाडू आहेत ज्यांच्यावर लिलावादरम्यान प्रथम बोली लावली जाते. हे खेळाडू जागतिक स्तरावर लोकप्रिय असतात आणि बहुतेक संघ त्यांना विकत घेऊ इच्छितात. सहसा या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मोठे नाव कमाववेले असते. आयपीएल लिलावापूर्वी सर्व संघ बीसीसीआयला त्या खेळाडूंची नावे देतात, ज्या खेळाडूंना ते मेगा लिलावात प्रथमत: खरेदी करू इच्छितात आणि अशाच खेळाडूंना मार्की खेळाडूंच्या यादीत ठेवले जोते. साधरणात: मार्की खेळाडूवर सहसा मोठ्या बोली लावली जातात आणि लिलावात यापैकीच एक खेळाडू सर्वात महागडा खेळाडू ठरतो.
2. रबाडा गुजरात टायटन्सच्या ताफ्यात…
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला गुजरात टायटन्सने विकत घेतले. रबाडाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरातने त्याला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले.
3. श्रेयस अय्यरवर पंजाबकडून पैशांचा वर्षाव…
पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरवर मोठा दाव लावला. त्याला 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अय्यर यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सनेही त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी पंजाबनं बाजी मारली.
4. बटलरला मिळाली मोठी रक्कम…
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरला गुजरात टायटन्सने विकत घेतले. बटलरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुजरातने त्याला 15.50 कोटी रुपयांना खरेदी केले.
5. मिचेल स्टार्क दिल्लीकडे…
ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मात्र त्याला 11.75 कोटी रुपयांना खरेदी केलं गेलं.
6. पंत बनला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू….
लखनौने यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला 27 कोटींना खरेदी केले. त्यामुळे पंत आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किंमतीला विकला जाणारा खेळाडू ठरला आहे. या प्रकरणात, त्याने श्रेयस अय्यरला मागे सोडले आहे, जो काहीच वेळापूर्वी 26.75 कोटी रुपयांना विकला गेला होता. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पंत यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता.
7. हैदराबादच्या ताफ्यात शमी…
मोहम्मद शमीवर सनरायझर्स हैदराबादने मोठा दाव लावला आहे. शमीला हैदराबादने 10 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत 2कोटी रुपये होती. शमी याआधी गुजरात टायटन्सचा भाग होता.
8. लखनौने विकत घेतले मिलरला
डेव्हिड मिलरला लखनौ सुपर जायंट्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. तर लखनऊने त्याच्यासाठी 7.50 कोटी रुपये मोजले.
9. चहलने देखील खाल्ला चांगलाच भाव….
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलला पंजाब किंग्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती पण पंजाबने चहलला 18 कोटी रुपयांना खरेदी करून त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे.
10. सिराजसाठी आरटीएमचा वापर नाहीच…
मोहम्मद सिराजला गुजरात टायटन्सने विकत घेतले. त्याला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतले. सिराज हा यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. मात्र आरसीबीने सिराजसाठी आरटीएमचा वापर केला नाही.
11. लिव्हिंगस्टमुळे आरसीबी होणार मजबूत..
लियाम लिव्हिंगस्टनची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती पण त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8.75 कोटी रुपयांना विकत घेतले. यापूर्वी तो पंजाब किंग्जचा भाग होता.
12. राहुलला 14 कोटी….
केएल राहुलला दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटींना विकत घेतले. राहुलची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. यापूर्वी तो लखनऊ सुपर जायंट्सचा भाग होता.
13. ब्रुकही दिल्लीच्या ताफ्यात….
हॅरी ब्रूकला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. ब्रूक हा इंग्लंडचा फलंदाज आहे.
14. देवदत्त पडिक्कल राहिला अनसोल्ड …
भारताचा फलंदाज देवदत्त पडिक्कल अनसोल्ड राहिला. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पण पडिक्कलवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
15. मार्करमला मिळाली मूळ किंमत
दक्षिण आफ्रिकेचा एडिन मार्करमला लखनऊ सुपर जायंट्सने मूळ किंमतीमध्ये विकत घेतले. मार्करमची मूळ किंमत 2 कोटी रुपये इतकी होती.
16. कॉनवे पुन्हा चेन्नईच्या ताफ्यात….
डेव्हॉन कॉनवेला चेन्नई सुपर किंग्सने 6.25 कोटी रुपयांना विकत घेतले. कॉनवेची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. तो याआधीही CSK चा भाग होता.
17. राहुल त्रिपाठीही सीएसकेकडे….
चेन्नई सुपर किंग्सने राहुल त्रिपाठीला विकत घेतले. त्रिपाठी याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. पण सीएसकेने त्याला 3.40 कोटींना खरेदी केले.
18. मॅकगर्कसाठी आरटीएमचा वापर
जॅक मॅकगर्कला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले. संघाने त्यांच्यासाठी आरटीएमचा वापर केला आहे. मॅकगर्कची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मात्र त्यांची नऊ कोटी रुपयांना विक्री झाली.
19. हर्षल पटेल हैदराबादकडे….
हर्षल पटेलला सनरायझर्स हैदराबादने 8 कोटी रुपयांना विकत घेतले. पंजाब किंग्जने RTM चा वापर केला. मात्र त्यांना हैदराबादच्या किमतीची बरोबरी करता आली नाही.
20. अश्विन-रवींद्र चेन्नईच्या ताफ्यात….
चेन्नई सुपर किंग्जने रचिन रवींद्रला विकत घेतले. त्याची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. पण संघाने 4 कोटींना विकत घेतले. CSK ने यासाठी RTM चा वापर केला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने रविचंद्रन अश्विनलासुध्दा आपल्या ताफ्यात घेतले असून त्याच्यासाठी 9.75 कोटी रुपये मोजले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.
21. व्यंकटेश अय्यरसाठी केकेआरनं केला खजिना खुला….
कोलकाता नाईट रायडर्सने व्यंकटेश अय्यरसाठी खजिना खुला केला आहे. केकेआरने व्यंकटेशला तब्बल 23.75 कोटींना विकत घेतले. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये इतकी होती.
22. स्टॉइनिस, मॅक्सवेल पंजाबच्या ताफ्यात…
मार्कस स्टॉइनिसला पंजाब किंग्सने 11 कोटी रुपयांना विकत घेतले. स्टॉइनिसची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेललासुध्दा पंजाब किंग्सने आपल्या ताफ्यात घेतले. त्यासाठी 4.20 कोटी रुपये मोजले. मॅक्सवेल यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता.
23. मिचेल मार्श लखनौकडे…
लखनौने मिचेल मार्शसाठी 3.40 कोटींची बोली लावली. दिल्लीकडे आरटीएम कार्ड उपलब्ध होते, पण त्यांनी ते मार्शसाठी न वापरण्याचा निर्णय घेतला.
24. आरसीबीकडे फिल सॉल्ट…
फिल सॉल्टला आरसीबीने 11.50 कोटी रुपयांना विकत घेतले. सॉल्टची आधारभूत किंमत दोन कोटी रुपये होती. सॉल्ट मिळविण्यासाठी आरसीबी आणि केकेआरमध्ये शर्यत होती, परंतु आरसीबीनं बाजी मारली.
25. डी-काॅक केकेआरच्या ताफ्यात….
क्विंटन डी कॉकची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती परंतु केकेआरने त्यासाठी 3.60 कोटी रुपये मोजले आणि खरेदी केले. लखनऊकडे डिकाॅकसाठी आरटीएम कार्ड उपलब्ध होते, परंतु त्यांनी ते वापरले नाही.
26. जॉनी बेअरस्टो राहिला अनसोल्ड..
जॉनी बेअरस्टोची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. पण तो अनसोल्ड राहिला गेला. बेअरस्टो हा इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज आहे.
27. अफगाणिस्तानचा गुरबाज केकेआरकडे…
रहमानउल्ला गुरबाजला कोलकाता नाईट रायडर्सने विकत घेतले. त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. गुरबाज याआधीही केकेआरकडून खेळला आहे.
𝙄𝙉𝙍 11.25 𝘾𝙧𝙤𝙧𝙚 𝙛𝙤𝙧 𝙄𝙨𝙝𝙖𝙣 𝙆𝙞𝙨𝙝𝙖𝙣! 👍 👍#SRH have a final say on that bid and they have Ishan Kishan on board! 👏 👏#TATAIPLAuction | #TATAIPL | @ishankishan51 | @SunRisers pic.twitter.com/AOYfI1UN09
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
28. मुंबईचा ईशान हैदराबादकडे…
इशान किशनला सनरायझर्स हैदराबादने 11.25 कोटी रुपयांना खरेदी केले. ईशानला मुंबई इंडियन्सने रिलीज केले. आता तो हैदराबादकडून खेळणार आहे.
29. आरसीबीकडे जितेश….
आरसीबीने जितेश शर्माला 11 कोटी रुपयांना खरेदी केले. पंजाब किंग्जने जितेशसाठी आरटीएमचा वापर केला होता. पण आरसीबीने दिलेल्या किमतीशी ते जुळवू शकले नाहीत.
30. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज हेझलवूड कोहलीच्या संघात
आरसीबीने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला 12.50 कोटींना खरेदी केले. हेजलवुडची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती पण त्याला मूळ किंमतीपेक्षा 10.50 कोटी जास्त मिळाले.