मुंबई -आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात एक अनोखा सोहळा होणार आहे. याच वानखेडे मैदानावर येत्या 30 एप्रिलला या स्पर्धेचा ऐतिहासिक 1 हजारावा सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्स व राजस्थान रॉयल्स यांच्यातील या सामन्यासाठी बीसीसीआयने आयपीएल समितीसह एका खार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा सामना टी-20 लीगच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय ठरावा व त्याचे निटनेटके आयोजन केले जावे या हेतूने एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्मला याचे कंत्राट देण्यात आले आहे. 2018 सालानंतर पहिल्यांदाच यंदाच्या स्पर्धेपूर्वी शानदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासूनचे हे यंदाचे 16 वे वर्ष असून त्यात होत असलेला हा एक हजारावा सामनाही कायमस्वरुपी चाहत्यांच्या आठवणींत राहावा यासाठी सगळे सज्ज बनले आहेत. कार्यक्रमाची रुपरेषा व एकूणच आयोजनाबाबतची सविस्तर माहिती बीसीसीआय लवकरच देणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलचा हा हजारावा सामना अन्य सर्व लीगसाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल. अशी तयारी बीसीसीआयकडून सुरू आहे. सेलीब्रीटीही ठरणार आकर्षण स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रमाणे या सामन्याच्या प्रारंभापूर्वी एक कार्यक्रम ठेवला जाणार आहे. त्यात बीसीसीआय व आयपीएल समितीचे पदाधिकारी, सर्व संघांचे खेळाडू, संघव्यवस्थापन व त्यांचे कुटुंबीय तसेच क्रीडा व चित्रपटसृष्टीतील सेलेब्रीटी यांची उपस्थिती राहणार आहे.