IPL 2023 | ग्लेन मॅक्सवेलबाबत महत्वाची अपडेट, पुढील IPL हंगामासाठी…

IPL 2023 – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. त्यानंतर त्याची दुखापत गंभीर असल्याने तो पुढील काही महिने क्रिकेटपासून लांब राहणार असल्याचे समजले होते. अशा स्थितीत हा स्टार खेळाडू पुढच्या आयपीएल मोसमात खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल की नाही, याची चिंता आरसीबीच्या चाहत्यांना लागलीआहे. मात्र, आता संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी मॅक्सवेलच्या पुढील हंगामात आयपीएल ख्रळण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
ग्लेन मॅक्सवेलच्या दुखापतीबाबतची अधिकृत माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली होती. त्यांनी मॅक्सवेलच्या दुखापतीबाबत सांगितले की, ‘मॅक्सवेल बर्थडे पार्टीसाठी मेलबर्नमध्ये असताना त्याच्या पायाला दुखापत झाली. यामध्ये त्याचा पाय फॅक्चर झाला आहे. त्यामुळे तो संपूर्ण उन्हाळ्याच्या हंगामात क्रिकेटच्या मैदानापासून दूर असणार आहे.’ ग्लेन मॅक्सवेल त्याच्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला मेलबर्नला गेला होता, तेव्हा घराच्या अंगणात धावताना त्याचा पाय घसरला आणि त्याला दुखापत झाली होती.
माईक हेसनने म्हटले की, “ग्लेन मॅक्सवेलच्या पायाला दुखापत झाल्याने त्याच्याबद्दल चिंता आहे. परंतु ग्लेनने लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे. आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार तो आयपीएल २०२३ सुरू होण्यापूर्वी तंदुरुस्त होईल. संघाचा समतोल राखण्यासाठी संघात मॅक्सवेलचे असणे गरजेचे आहे.”





