मोहाली – आयपीएल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत रॉयल चॅलेंजर बंगळुरुने पंजाब किंग्जचा सहज पराभव केला. बंगळुरुचा सलामीवीर फाफ डुप्लेसी व कर्णधार विराट कोहली यांनी वादळी अर्धशतके फटकावत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर महंमद सिराजने भेदक गोलंदाजी करत पंजाबच्या फलंदाजीतील हवाच काढून टाकली. बंगळुरुने हा सामना 24 धावांनी जिंकला. पंजाबचा कर्णधार सॅम कुरेनने नाणेफेक जिंकत बंगळुरुला पहिल्यांदा फलंदाजी दिली. डुप्लेसी व कोहलीने थाटात प्रारंभ करताना पंजाबच्या गोलंदाजीची वाताहत केली. या जोडीने तब्ल 137 धावांची सलामी दिली. यावेळी कोहली धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात अनावश्यकरीत्या बाद झाला. त्याने आपल्या 59 धावांच्या अर्धशतकी खेळीत 37 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 1 षटकार फटकावला. तो बाद झाल्यावर डुप्लेसीला शतकाची संधी होती मात्र, त्यानेही संयम राखला नाही व तो 84 धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने 56 चेंडूत 5 चौकार व 5 षटकारांची आतषबाजी केली. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर त्यांच्या एकाही फलंदाजाला चमक दाखवता आली नाही व त्यांचा डाव 20 षटकांत 4 बाद 174 असा मर्दायीत राहिला. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने सर्वाधिक 2 गडी बाद केले. अर्शदीप सिंग व नाथन एलिस यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव कधी सावरलाच नाही. प्रभसिमरन सिंग व जीतेश शर्माचा अपवाद वगळता त्यांच्याकडून एकाही फलंदाजाने मोठी खेळी करण्याची जिद्द दाखवली नाही. प्रभसिमरन सिंगने 46 धावांची खेळी करताना 30 चेंडूत 3 चौकार व 4 षटकार फटकावले. तळात जीतेश शर्माने चमक दाखवताना 27 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 41 धावा केल्या. मात्र, बंगळुरुच्या अचुक गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टीकून राहता आले नाही व ते पूर्ण 20 षटकेही खेळू शकले नाहीत. बंगळुरुकडून सिराजने सर्वाधिक 4 गडी बाद केले. सिराज ठरला अनप्लेयेबल या सामन्यात बंगळुरुचा वेगवान गोलंदाज महंमद सिराज खरोखर अनप्लेयेबल ठरला. पंजाबच्या फलंदाजांना त्याने आपल्या तालावर नाचवले. त्याने अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, हरप्रीत ब्रार व नाथन एलिस यांचे बळी घेतले. तसेच क्षेत्ररक्षणातही चमक दाखवताना हरप्रीत सिंग बाठीयाला धावबाद केले. त्याच्या गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजीची वाताहत झाली व बंगळुरुचा विजय सुकर बनला. संक्षिप्त धावफलक रॉयल चॅलेंजर बंगळुरु – 20 षटकांत 4 बाद 174 धावा. (फाफ डुप्लेसी 84, विराट कोहली 59, हरप्रीत ब्रार 2-31). पंजाब किंग्ज – 18.2 षटकांत सर्वबाद 150 धावा. (प्रभसिमरन सिंग 46, जीतेश शर्मा 41, महंदम सिराज 4-21, वनिंदू हसरंगा 2-39).