चेन्नई -भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा परिसस्पर्श एखाद्या खेळाडूला लाभला तर त्याचे नशीब उजळते, असे ट्विट भारताचे माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर यांनी केले आहे. धोनीने भारतीय संघाचा कर्णधार असताना जे रवींद्र जडेजा व सुरेश रैनाबाबत केले तेच त्याने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणे व शिवम दुबे यांच्याबाबतीत केले, असेही मांजरेकर यांनी म्हटले आहे. 2007 सालच्या आयसीसीटी-20 विश्वकरंडक स्पर्धेत जोगिंदर शर्माला अखेरचे षटक देणे किंवा जडेजा व रैना यांना सातत्याने पाठिंबा देणे या गोष्टींमुळेच ते सगळे यशस्वी ठरले. कोणत्या खेळाडूकडून कशी सरस कामगिरी करून घ्यायची याबाबत त्याचे निर्णय अचूक ठरले आहेत. तो भारतीय संघाचा कर्णधार असताना जडेजा व रैना यांना त्याच्यामुळेच सातत्याने संधी मिळाली व ते यशस्वी ठरले, असे मांजरेकर म्हणाले. भारतीय संघातून निवृत्ती घेतल्यावरही तो आता चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व त्याच पद्धतीने करत आहे. कसोटी संघातून स्थान गमावलेला अजिंक्य रहाणे व भारतीय संगातून स्थान गमावलेला शिवम दुबे यांना त्यानेच सातत्याने संधी दिली व यंदाची आयपीएल स्पर्धा हे दोन्ही खेळाडू गाजवत आहेत. त्यांच्या यशात त्यांची मेहनत व गुणवत्ता आहेच; परंतु धोनीचाही वाटा मोठा आहे. धोनी ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे नशीबच पालटते, असेही मांजरेकर यांनी सांगितले.