आयपीएल 2022 | लिलावही लांबणीवर पडणार

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठीचा लिलाव पुढील महिन्यात होणार होता. मात्र, करोना व ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे हा लिलाव काही काळ लांबणीवर पडणार आहे.
बीसीसीआयने याच कारणाने देशांतर्गत स्पर्धा स्थगित करण्यात आल्यानंतर आता आयपीएलबाबतही येत्या काही दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.
आयपीएल स्पर्धेसाठी यंदाच्या नव्या मोसमात अनेक खेळाडूंनी एका संघातून दुसऱ्या संगाकडे जाणार असून त्यासाठीच मोठा लिलाव होणार होता. त्यातच अहमदाबाद व लखनौ हे दोन नवे संघ यंदापासून स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यासाठी या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हा लिलाव बेंगळुरूमध्ये येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार होता. मात्र, देशात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती निर्माण झालेली असल्यामुळे या लिलावाच्या वेळापत्रकात तसेच ठिकाणांत बदल केले जाणार असल्याचे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.





