Cricket in LA2028 Olympics : 128 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर लॉस एंजिलिस ऑलिम्पिक 2028 मध्ये क्रिकेटचा समावेश झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) प्रचंड उत्साहात आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ऑलिम्पिक चळवळ आणि भारतीय क्रीडाप्रेमी यांच्यात अधिक घट्ट नाते निर्माण होईल, असा विश्वास आयओसीच्या अध्यक्षा क्रिस्टी कॉवेंट्री यांनी व्यक्त केला आहे. क्रिस्टी कॉवेंट्री यांनी स्पष्ट केले की, क्रिकेटच्या समावेशामुळे भारत आणि ऑलिम्पिक यांच्यातील संबंधांना एक नवी दिशा मिळेल. त्या म्हणाल्या, “ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाल्याने भारतसारख्या मोठ्या क्रीडाप्रेमी देशासोबतचे आमचे नाते अधिक दृढ होईल. यामुळे भारतीय चाहते आणि ऑलिम्पिक स्पर्धा यांच्यातील दरी कमी होण्यास मदत होईल.” भारतात योग्य मीडिया पार्टनरचा शोध – ऑलिम्पिक स्पर्धांची लोकप्रियता वाढवण्यासाठी आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयओसी प्रयत्नशील आहे. क्रिस्टी कॉवेंट्री यांनी सांगितले की, आयओसी सध्या भारतात खेळांच्या थेट प्रक्षेपणासाठी (Telecast) योग्य मीडिया पार्टनरच्या शोधात आहे. भारतासारख्या विशाल देशामध्ये योग्य भागीदार मिळाल्यास ऑलिम्पिकचा हा महाउत्सव गावागावांपर्यंत पोहोचू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. हेही वाचा – ICC Big Decisions : भारताच्या विश्वविजयानंतर ICC चा ऐतिहासिक निर्णय! पुढील विश्वचषकात दिसणारा ‘हा’ मोठा बदल 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या भारताच्या स्वप्नावर प्रतिक्रिया – भारताने अलीकडेच 2036 ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद भूषवण्याची दावेदारी सादर केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना क्रिस्टी कॉवेंट्री यांनी सांगितले की, क्रिकेटच्या पुनरागमनामुळे भारत आणि ऑलिम्पिक यांच्यात एक नवा आणि महत्त्वपूर्ण संबंध निर्माण होईल. त्या म्हणाल्या, “लॉस एंजिलिस ऑलिम्पिक-2028 मध्ये क्रिकेटच्या प्रवेशामुळे भारतीय चाहते खेळांच्या या महाकुंभाशी आणखी जवळ येतील.” टी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेटची ऑलिम्पिकमध्ये वापसी – क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये टी-२० फॉरमॅटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. क्रिकेटचा खेळ शेवटचा 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळला गेला होता. तब्बल 128 वर्षांनंतर हा खेळ ऑलिम्पिकच्या मंचावर परत येत आहे. विशेष म्हणजे, यावेळी पुरुष आणि महिला अशा दोन्ही वर्गात क्रिकेटचे सामने खेळवले जातील. ज्यामध्ये प्रत्येकी ६-६ संघ भाग घेतील. हेही वाचा – IND vs AUS : अभिषेक शर्माने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड! अवघ्या ५२८ चेंडूत ‘हा’ खास पराक्रम करणारा जगातील पहिलाच खेळाडू ‘भागीदारीतून समाजावर सकारात्मक परिणाम’ – आयओसी अध्यक्षा पुढे म्हणाल्या की, संस्थेचे उद्दिष्ट अशा भागीदारी निर्माण करणे आहे, ज्यांचा समाजावर सकारात्मक परिणाम होईल. “मूल्ये, प्रामाणिकपणा आणि सामाजिक प्रभाव वाढवणे हा भागीदारीतून साध्य करण्याचा आमचा उद्देश आहे. भारत या दिशेने आधीपासूनच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, भारतात मीडिया हक्कांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि भारतातील प्रत्येक चाहत्याला या उत्सवाचा भाग बनता यावा यासाठी योग्य मीडिया पार्टनर शोधण्याचे आयओसीचे लक्ष्य आहे.