लखनौ – अयोध्येतील मशिदीला उत्तर प्रदेश सरकारतर्फे अयोध्या जिल्ह्यातील धन्नीपूर गावात पाच एकर जागा देण्यात आली असून त्या ठिकाणी मशिदी खेरीज अन्य जी सार्वजनिक सुविधांची कामे उभी राहणार आहेत त्या इमारतीच्या पायाभरणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना निमंत्रण देण्यात येणार आहे, अशी माहिती इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनचे प्रवक्ते अतहर हुसेन यांनी पीटीआयला सांगितले.
सरकारने दिलेल्या जागेवर वाचनालय, कम्युनिटी किचन आणि संशोधन केंद्र उभारले जाणार असून या इमारतींच्या पायाभरणीसाठी योगींना निमंत्रण दिले जाणार आहे असे ते म्हणाले.
मशिदीच्या पायाभरणीसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देणार काय असे विचारता ते म्हणाले की, आम्ही इस्लामच्या हनाफी, हनाबली, शफी आणि मलिकी या चारही विचारप्रवाहांचा शोध घेतला असता त्यात कोठेही मशिदीच्या उभारणीपूर्वी पायाभरणी कार्यक्रम करण्याचा उल्लेख नाही. त्यामुळे मशीद उभारणीचा पायाभरणी कार्यक्रम केला जाणार नाही.
या मशिदीला बाबरी मशीद असेच नाव दिले जाणार आहे काय, असे विचारता ते म्हणाले की, असा कोणताही विचार नाही. या मशिदीला कोणते नाव द्यायचे ते अजून ठरलेले नाही. सौदी अरेबियातील्या मदिना येथील मसजिद-ई-नबाबी आणि अन्य काही मशिदी वगळता अन्य कोणत्याही मशिदीच्या नावाचे फार महत्त्व नाही. केवळ मशिदीत केली जाणारी सजदा ही अल्लासाठी महत्त्वाची आहे, बाकी साऱ्या बाबी निर्रथक आहेत असेही त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्ट मार्फत या मशीद उभारणीचे काम केले जाणार असून या ट्रस्टचे लखनौमध्ये मध्यवर्ती कार्यालय लवकरच सुरू केले जाणार आहे. दरम्यान, सरकारकडून या प्रकल्पाच्या जमिनीचे कायदेशीर हस्तांतरण करण्यात आले असून जमीन मालकीच्या हक्काची सारी कागदपत्रे अधिकृतपणे आमच्या ताब्यात देण्यात आली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. ही जागा पाच एकर इतकी आहे.
अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार यांनी ही कागदपत्रे ट्रस्टच्या सदस्यांकडे सुपूर्त केली. या ट्रस्टमध्ये एकूण पंधरा सदस्य नियुक्त केले जाणार असून त्यातील नऊ नावे या आधीच निश्चित करण्यात आली आहेत. उर्वरित नावे लवकरच निश्चित केली जातील, अशी माहितीही हुसेन यांनी दिली.