एसआयपीमधील गुंतवणूक लाॅकडाऊनमुळे मंदावली

नवी दिल्ली – सलग सहा महिन्यांपासून सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन द्वारा म्युच्युअल फंडामध्ये होत असलेली गुंतवणूक कमी होत आहे.
सप्टेंबर महिन्यात या माध्यमातून होणारी गुंतवणूक केवळ 7788 कोटी रुपये झाली. प्राईम इन्वेस्टर या कंपनीचे सहसंस्थापक विद्या बाला यांनी म्हटले की, नागरिकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कमी होत असल्याचे दिसून येते.
गुंतवणूक कमी झाली असली तरी म्युच्युअल फंडातील खात्यांची संख्या मात्र सप्टेंबर महिन्यात 7 लाख 37 हजारांनी वाढली. खात्याच्या संख्येवरून म्युच्युअल फंडात होत असलेल्या गुंतवणुकीचा अंदाज येत नाही. मुळात गुंतवणुकीची रक्कम कमी झाली असल्याचे ते म्हणाले.
आता बहुतांश शहरातील लॉकडाऊन संपुष्टात आले आहे. त्यामुळे नागरिकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतरच या क्षेत्रात होणारी गुंतवणूक वाढू शकेल.





