एसआयपी, शेअरसंबंधी फंडातील गुंतवणूक का मंदावली?

नवी दिल्ली – शहरातील नागरिकांच्या उत्पन्नावर वेतन वाढ कमी झाल्यामुळे परिणाम झाला आहे. त्याचे परिणाम आता अर्थव्यवस्थेबरोबरच गुंतवणुकीवर दिसून येत आहेत. कार विक्री कमी झाली आहे. ग्राहक वस्तू क्षेत्रातील विक्री कमी झाली आहे. आता म्युच्युअल फंडात होत असलेली गुंतवणूक कमी झाल्याचे आकडेवारी समोर आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात मासिक पातळीवर शेअर संदर्भातील म्युच्युअल फंडात म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंडात झालेली गुंतवणूक 14 टक्क्यांनी कमी होऊन 35,943 कोटी रुपये झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये या क्षेत्रात झालेली गुंतवणूक 41,887 कोटी रुपये होती. मात्र तरीही सलग 45 व्या महिन्यामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील ओघ सकारात्मक आहे. मासिक पातळीवर एसआयपीत झालेली गुंतवणूक नोव्हेंबर महिन्यात 25,320 कोटी रुपये या पातळीवर स्थिर राहिली.
म्युच्युअल फंड उद्योगात नोव्हेंबर महिन्यात केवळ 60,295 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक झाली. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही गुंतवणूक तब्बल 2.4 लाख कोटी रुपये होती. यामुळे म्युच्युअल फंडाच्या नियंत्रणाखाली असलेली एकूण मालमत्ता किंचित वाढून 68.08 लाख कोटी रुपये झाली आहे. ऑक्टोबरमध्ये ही रक्कम 67.25 लाख कोटी रुपये होती. एकूण उत्पन्न मंदावले असल्यामुळे मध्यमवर्गीयाच्या खर्चाबरोबरच गुंतवणुकीवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. नोव्हेंबर महिन्यामध्ये गोल्ड ईटीएममध्ये झालेली गुंतवणूक कमी होऊन 1,257 कोटी रुपये झाली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ही रक्कम , कोटी रुपये होती.
गुंतवणूक का मंदावली –
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट छलसानी यांनी सांगितले की, सध्या देशात आणि परदेशात अनेक नकारात्मक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात या क्षेत्रावरही परिणाम झालेला आहे. मात्र तो जास्त गंभीर नाही. काही विश्लेषकांनी सांगितले की, शेअर बाजारात कमालीची अस्थिरता आहे. स्थूल अर्थव्यवस्था नकारात्मक आकडेवारी दर्शवीत आहे. अमेरिकेतील निवडणुकानंतर जागतिक आर्थिक परिस्थिती अस्थिर आहे. त्याचबरोबर जगात दोन युद्ध चालू आहेत. या सर्व घडामोडींचा इतर बाजाराबरोबरच म्युच्युअल फंडावर परिणाम अपेक्षित आहे.





