पुणे – पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचे लागेबांधे “इसिस’ या दहशतवादी संघटनेशी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता याप्रकरणाचा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला जाणार आहे. याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. “एनआयए’ सध्या “इसिस’चा महाराष्ट्र मॉड्युलच्या डॉ. अदनान अली सरकारचा तपास करत आहे. डॉ. सरकार आणि “एटीएस’ने अटक केलेल्या आरोपींचे लागेबांधे उघड झाले आहेत. यानंतर “एनआयए’ने स्वत:कडे तपास घेण्यासाठी जलद हालचाली सुरू केल्या होत्या. “एनआयए’कडे तपास सोपविण्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया मंगळवारपर्यंत (दि.8) पूर्ण होणार असल्याची माहिती “एटीएस’ अधिकाऱ्यांनी दिली. कोथरूड परिसरात दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या मोहंमद युनूस मोहंमद याकूब साकी (24) आणि मोहंमद इम्रान मोहंमद युसूफ खान (23 दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) यांना पोलिसांनी 18 जुलै 2023 रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची स्फोटक पावडर, काडतूस, पिस्तूल, कार बॉम्ब बनविण्याचे साहित्य, दहशतवादी संघटनांची पत्रके तसेच ड्रोनचे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणाचा तपास “एटीएस’कडे सोपविण्यात आला होता. दोघांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट चाचणी केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कोंढवा भागात याकूब साकी आणि इम्रान खान यांना राहण्यास खोली देणारा अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (32, रा. कोंढवा) आणि त्यांना आर्थिक रसद पुरविणारा खासगी कंपनीतील अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी (27 , मूळ रा. रत्नागिरी) यांना अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी पुण्यासह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाताचा कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले. “इसिस’च्या दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना जाळ्यात ओढण्यात महाराष्ट्रातील गट सक्रीय होता. डॉ. सरकारने पुरवले पैसे एनआयएच्या ताब्यात असलेल्या डॉ. सरकारने एटीएस तपास करत असलेल्या कोंढवा मॉड्युलच्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याची माहिती पुढे येत आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. एटीएसने शनिवारी रात्री कारवाई करून दहशतवाद्यांची दुचाकी, मोटार जप्त केली, तसेच पिस्तूल आणि पाच काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.