प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 4 -महापालिकेच्या पर्वती जलकेंद्रात टॅंकर पॉइंटच्या नियंत्रण कक्षात लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या लाला बांदल या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
महापालिकेडून तब्बल दीडशे कोटी रुपयांचा खर्च करून काही वर्षांपूर्वीच पर्वती जलकेंद्राचे विस्तारीकरण तसेच त्या ठिकाणी अत्याधुनिक पाणीपुरवठा यंत्रणा बसविलेली आहे. असे असले तरी टॅंकर पॉइंटच्या नियंत्रण कक्षाची प्रचंड दुरवस्था झालेली होती. तसेच या ठिकाणी वारंवार शॉर्टसर्किटच्या घटना होत होत्या. त्यातच ही दुर्देवी घटना घडल्याने या ठिकाणी देखभाल दुरुस्ती केली होते की नाही, सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना होत्या, याची चौकशी करण्याबाबत अतिरिक्त आयुक्तांनी सूतोवाच केले आहे.
बांदल यांच्याकडे पर्वती जलकेंद्रातील टॅंकर भरणा केंद्रासाठीच्या मोटारी चालू व बंद करण्याची जबाबदारी होती. मंगळवारी सकाळी सात वाजता बांदल यांनी मोटर सुरू करण्यासाठी बटन दाबताच तेथे स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत भाजून बांदल गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. महावितरणच्या अभियंत्यांनी तपासणी केली; पण त्यांना या स्फोटाचे नेमके कारण कळू शकलेले नाही. त्यानंतर राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षकांनी तपासणी केली आहे, त्याचा अहवाल दोन दिवसांत मिळणार आहे.