पिंपरी | तळेगाव दाभाडेत मोराच्या मृत्यूची चौकशी करा

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – मारुती मंदिरासमोरील खिंडीत मोर मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात व्यक्तीने त्याला लाकडाच्या दांडक्याने मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी चौकशी करावी, अशी पक्षीप्रेमी नागरिकांनी मागणी केली आहे.
मुंबई-पुणे महामार्गालगत तळेगाव दाभाडे हद्दीत वन खात्याच्या मालकीचा चौराई डोंगर आहे. त्या ठिकाणी मोरांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास मोर मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर वडगाव मावळचे वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका मोरावर लाकडी दांडक्याने हल्ला केला. त्यामध्ये, त्याचा मृत्यू झाल्याचा संशय वन्यप्राणी प्रेमींनी व्यक्त केला आहे. वन्य प्राणी यांची शिकार करणाऱ्या आरोपींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पक्षीप्रेमी नागरिकांनी केली आहे.





