टोकियो – जपानच्या दक्षिणेकडील बेटांजवळ एक पाणबुडी जपानने शोधली. ही पाणबुडी चीनची असावी, असा कयास आहे, असे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. चीनने पूर्व चीन समुद्रात आपल्या लष्करी हालचाली वाढवल्यानंतर जपानने आपली सतर्कता वाढवली आहे.
ही पाणबुडी पाण्याच्या आत होती. मात्र ती चीनची असावी असा संशय आहे. कारण, चीनी बनावटीचे क्षेपणास्त्र नाशक लुयांग 3 हे त्या पाणबोटीजवळ आढळले आहे, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. अमामीओशिमा बेटाजवळ ही पाणबुडी आहे. हे बेट सध्या जपानच्या ताब्यात आहे. मात्र त्यावर चीन आपला अधिकार सांगत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
ही पाणबुडी रविवारी पश्चिमेच्या दिशेने निघून गेली.जपानच्या हद्दीतील पाण्यात कोणतीही बोट अथवा पाणबुडी प्रवेश करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार कोणत्याही पाणबुडीस दुसऱ्या देशाच्या सागरी हद्दीत प्रवेश करताना पाण्याच्या पृष्टभागावर येत आपल्या देशाचा ध्वज लावावा लागतो.जपानच्या आत्मसंरक्षण मंत्रालयाने तातडीने तीन विमाने आणि दोन विनाशिका या भागात पाठवल्या.
पाणबुडीस इशारा देण्यासाठी आणि चीनच्या हेतूचे मुल्यमापन करण्यासाठी ही कार्यवाही करण्यात आली, असे जपानच्या संरक्षण खात्याच्या निवेदनात म्हटले आहे.चीनच्या आणखी एका पाणबुडीने जपानच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याचे प्रकरण 2020 मध्ये उघडकीस आले होते. चीनने मात्र आपल्या या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. आमचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि विकासाचे लक्ष्य यांचे संरक्षण करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार असल्याचे चीनने म्हटले आहे.