– स्वप्निल काळे अनेकांना माहीतही नसेल… परंतु आज पुरुष दिन आहे. महिला दिनासारखे विशेष कोणतेही कार्यक्रम या दिनी नसतात. पुरुषांना त्यांच्या दिनाच्या शुभेच्छाही दिल्या जात नाही. फादर्स डे प्रमाणे पुरुष दिनही उपेक्षितच असतो. विविध संघटना, कार्यालयांमध्ये महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आवर्जून शुभेच्छा दिल्या जातात. महिलांचे समाजातील, कुटुंबातील महत्त्व अधाेरेखित केले जाते. यशस्वी महिलांचे सत्कार सोहळे होतात. पुरुष दिनी मात्र असे काहीही होत नाही. बहुदा अनेकांना माहीत देखील नसते की पुरुष दिन देखील असतो. आज पुरुष दिन.. नेहमी दुर्लक्षित होणाऱ्या कुटुंबातील महत्त्वाच्या घटकाला आज तरी थोडा आधार देऊन बघूया. शांतपणे तोंडातून एकही शब्द न काढता परिस्थितीशी झुंजणाऱ्या खांद्यांना एक अमूल्य संदेश देऊन बघूया.. “तू ही महत्त्वाचा आहेस, तुझ्याही भावनांना अमूल्य किंमत आहे. तुझ्या संघर्षामुळेच परिवारातील आनंदाची ज्योत तेवत आहे. थोडं थांब, श्वास घे आणि एक दिवस तरी स्वतःच्या स्वप्नांना जगून बघ, या जगात.” आईवर अनेक कविता लिहिल्या गेल्या, बहिणीची ही माया ओसांडून वाहू लागली. आजी आजोबांना तर पहिल्या मित्राची उपमा दिली गेली. अगदी मित्रालाही सुदामाचा श्रीकृष्ण संबोधलं गेलं. पण घरातल्या त्या भक्कम आधाराचं काय? ज्याला सगळे पुरुष या नावाने ओळखतात, खरंच नावाप्रमाणे दिसतो तितका तो खंबीर असतो का.. खरंच त्याला वेदना होत नसतील का.. नेहमी कणखर असणारे त्याचे हात, कधीच थरथरत नसतील का.. त्याच्या अंतर्मनात सुरू असणारा संघर्ष कधीच कोणाला दिसू शकत नाही स्वतःच्या परिवारासाठी, जीवापेक्षा प्रिय स्वतःच्या मुलांसाठी तो या जगाशी रोज झगडत असतो, परिस्थितीशी दोन हात करत असतो पण त्याच्या अंतर्मनात सुरू असणारा संघर्ष कधीच कोणाला दिसू शकत नाही. कारण तो कितीही हसत असला, तरी त्या हसऱ्या चेहऱ्या मागचे अश्रू कोणीच ओळखू शकत नाही. एक जबाबदार पुरुष होण्यासाठी कुठली परीक्षा द्यावी लागत नाही. फक्त घरातल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांची पंख छाटावे लागतात. आणि हे ज्याला जमलं तो जबाबदार पुरुष झाला. मातृदिनी सगळीकडे आईसोबतचे फोटो दिसतात, पितृ दिनाच्या दिवशी बाप मात्र अडगळीत पडलेला असतो. महिला दिनाच्या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, पण पुरुष दिनाच्या दिवशी पुरुषांवर जरा जास्तच जबाबदारी असते. घरातल्या कर्त्या पुरुषामुळेच घराला खरी ताकद मिळते. पण त्या कर्त्या पुरुषालाही कुठल्या आधाराची गरज पडतच असेल ना. त्याला डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब काढण्याचीही परवानगी नाही, कारण… सुटलेले स्वप्न आणि स्वीकारलेल्या त्यागाला या जगाने कर्तव्य या एका शब्दात मोजलेलं आहे. विरोधात जाणाऱ्या गोष्टीही लहान डोळ्यात साठवत शांतपणे सहन करताना त्याला वाईट वाटत नसेल का.. की हे सगळं तो फक्त कुटुंबासाठी सहन करत असेल. कामाचा ताण, घरच्याच जबाबदाऱ्या आणि अर्ध्या वाटेत सोडून गेलेली आपली माणसं त्याला त्रास देत असतीलच. पण त्याला डोळ्यातून अश्रूंचा एक थेंब काढण्याचीही परवानगी नाही. कारण आपण ढासळलो तर कुटुंबाला जपणार कोण, या विचारात तो एक एक दिवस फक्त रेटत असतो. खरंतर त्याची काही खूप मोठी अशी अपेक्षा नसते. त्याला फक्त कुटुंबाच्या आधाराची गरज असते. “तू लढ, मी आहे तुझ्यासोबत” या आधाराच्या शब्दांची गरज असते. पण आपलं आयुष्य आपल्या पुरतं जगत असताना, याच कुटुंबाच्या आधाराला कुठेतरी दुर्लक्षित केलं जातं आणि त्याचा संघर्ष त्याच्या पुरताच मर्यादित राहतो.