मुंबई : महायुतीत अंतर्गत धुसफूस; स्थानिक स्वराज्य निवडणूकांमध्ये बेबनावराज्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता मिळवली असली तरी प्रत्यक्षात त्यांच्यातील अविश्वास आणि राजकीय कुरघोडी आणखी वाढताना दिसत आहे. दिल्लीतील हिवाळी अधिवेशनापूर्वी आयोजित सर्वपक्षीय बैठकीने तर हा संघर्ष लोकांसमोर उघडपणे आणला. महत्त्वाची बैठक असतानाही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आणि शिवसेनेच्या प्रमुख चेह-यांनी बैठकीला हजेरी लावली नसल्याने महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. दिल्ली येथील बैठकीस सर्वसाधारणपणे राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे उपस्थित राहतात, तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे. मात्र यंदा हे दोघेही न येता त्यांची जागा इतरांनी भरली. त्यामुळे ही नुसती अनुपस्थिती नसून महायुतीतील तणावाची मोठी घंटा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाढली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळीही या अस्वस्थतेला खतपाणी घालत आहे. मंगळवारी मतदान तर ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार. पण या निवडणुका महायुतीने एकजुटीत लढवण्याऐवजी तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मैदान गाजवण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळे अनेक शहरांमध्ये आणि नगरांमध्ये महायुतीचेच उमेदवार थेट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. कार्यकर्त्यांना पळवून नेणे, गटबाजी, बदनामी, पोस्टरयुद्ध अशा प्रकारांनी स्थानिक राजकारण तापले आहे. राज्याची तिजोरी कोणाच्या हातात? खरी ताकद कोणाची? वर्चस्व कुणाचे? या प्रश्नांवरून नेते खुलेआम शब्दयुद्ध करताना दिसतात. सत्ताधा-यांपैकीच प्रत्येकजण स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी एकमेकांना अडचणीत आणताना दिसत आहे. अलीकडेच भाजप आणि शिंदेसेनेतील कडवटपणा सर्वांत टोकाला गेला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे काही नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले. हा शिंदे गटासाठी मोठा आघात ठरला. यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने मुंबईतील मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली नाही. त्यानंतर शिवसेना खासदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, आपल्या लोकांना फोडले जात असल्याची तक्रार जोरदार मांडली. फडणवीसांनीही कमी न पडता, फोडाफोडीत पहिले तुम्हीच पुढाकार घेतला होता, अशी टोलेबाजी केली. हे सर्व घडत असताना महायुतीतून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर डोळा ठेवू नये, असा तात्पुरता तह करण्यात आला. मात्र राजकीय वर्तुळाचा अंदाज आहे की हा तह जास्त काळ टिकणे अवघड आहे.